दोन खासगी सावकारांविरूद्ध गुन्हा दाखल; पोलीस अधीक्षकांचा दणका : सावकारांविरूद्ध मोहीम तीव्र करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 09:25 PM2018-09-05T21:25:17+5:302018-09-05T21:26:06+5:30
खासगी सावकारांविरोधात जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी कारवाईची मोहीम उघडली आहे. त्यांच्या दणक्यानंतर दोन खासगी सावकारांविरूद्ध विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सांगली : जिल्तील खासगी सावकारांविरोधात जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी कारवाईची मोहीम उघडली आहे. त्यांच्या दणक्यानंतर दोन खासगी सावकारांविरूद्ध विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर सावकारी व्यवसायाला चाप लावण्यासाठी शर्मा यांनी अॅक्शन प्लॅनही तयार केला आहे.
विशाल विलास कुडचे व गणेश अनिल वायदंडे (दोघेही रा. विश्रामबाग) अशी गुन्हा दाखल झालेल्या खासगी सावकारांची नावे आहेत. याप्रकरणी स्वप्नील प्रकाश गळतगे (रा. प्रगती कॉलनी) यांनी फिर्याद दिली होती. गळतगे यांचा प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय आहे. त्यांना व्यवसायासाठी पैशाची गरज होती. त्यांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये एका बँकेत कर्जासाठी अर्जही दिला होता. बँकेतील कर्मचाऱ्याने गळतगे यांना कुडचे याच्याकडून व्याजाने पैसे उपलब्ध होतील, असे सांगितले. त्यानुसार गळतगे यांनी कुडचे याच्याकडून चार लाख रुपये व्याजाने घेतले. त्याबदल्यात दोन कोरे धनादेश व शंभर रुपयांचा मुद्रांक दिला. कुडचे याने चार महिन्याच्या व्याजापोटी एक लाख आठ हजार रुपये कापून घेऊन उर्वरित रक्कम गळतगे यांना दिली.
गळतगे यांनी चार लाख ३८ हजाराची रक्कम परत केली. तरीही कुडचे याने तीन लाख ९५ हजार रुपयांची बाकी असल्याचे सांगत, गळतगे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर गणेश वायदंडे व कुडचे यांनी गळतगे कुटुंबियांना वारंवार त्रास देण्यास सुरूवात केली. या त्रासाला कंटाळून गळतगे यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दिली होती. तसेच जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनाही निवेदन दिले होते. त्याची गंभीर दखल घेत शर्मा यांनी कुडचे व वायदंडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश विश्रामबाग पोलिसांना दिले. त्यानुसार खासगी सावकारी अधिनियम १९४६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.