वृक्षतोडप्रकरणी गुन्हा दाखल -आयुक्तांची माहिती : आमराई वृक्षतोड प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:49 PM2019-02-07T23:49:35+5:302019-02-07T23:54:32+5:30
आमराई उद्यानातील बेकायदा वृक्षतोडप्रकरणी महापालिकेने कंत्राटदार सिद्ध रेड्डी याच्याविरूद्ध सांगली शहर पोलिसांसह न्यायालयातही गुन्हा दाखल केल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी गुरुवारी
सांगली : आमराई उद्यानातील बेकायदा वृक्षतोडप्रकरणी महापालिकेने कंत्राटदार सिद्ध रेड्डी याच्याविरूद्ध सांगली शहर पोलिसांसह न्यायालयातही गुन्हा दाखल केल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. उद्यान विभागाकडील कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या असून त्यांचे म्हणणे आल्यानंतर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.गेल्या आठवड्यात आमराई उद्यानात आॅफिसर्स क्लबच्या टेनिस कोर्टवर पालापाचोळा पडतो, म्हणून वृक्षतोड करण्यात आली.
या वृक्षतोडीवरून शहरात मोठा गदारोळ उडाला. राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात, सागर घोडके, मयूर घोडके यांनी आमराईतच ठिय्या मारत कारवाईची मागणी केली. त्यानंतर सामाजिक संघटना व निसर्गप्रेमींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या प्रकरणात आॅफिसर्स क्लबचे सदस्य असलेले वरिष्ठ अधिकारी, मोठ्या ठेकेदारांवर संशय व्यक्त होत होता. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यात आल्याची चर्चा होती.
वृक्षतोडीबाबत आयुक्त खेबूडकर म्हणाले की, वृक्षतोडप्रकरणी आॅफिसर्स क्लबचे क्रीडा अधिकारी पै, कामत व झाडे तोडणारा ठेकेदार यांचे जबाब घेण्यात आले आहेत. ठेकेदाराला दूरध्वनी करून झाडे तोडण्यास सांगितले. वास्तविक महापालिकेने अथवा वृक्ष समितीने परवानगी दिली नसतानाही ही झाडे तोडली गेली. झाडे तोडण्याचे कंत्राट दिलेल्या रेड्डी याला फांद्या तोडण्यास सांगितले होते. पण त्याने काही झाडे बुंध्यापर्यंत तोडली. या झाडांना कीड लागल्याने ती बुंध्यापर्यंत तोडल्याचे त्याने जबाबात सांगितले आहे. महापालिकेने कंत्राटदार रेड्डी याच्याविरूद्ध शहर पोलीस व जिल्हा न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे.
उद्यान विभागाकडील कर्मचाºयांनाही कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या आहेत. त्यांचे म्हणणे आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. २७ जानेवारी रोजी महापालिकेला सुटी होती. सुटीच्या दिवशी झाडे तोडण्यात आली. हा प्रकार चुकीचाच आहे. त्यात कोणतीही परवानगी दिलेली नसतानाही झाडे तोडली गेली, अशी कबुलीही आयुक्तांनी दिली.
तो दूरध्वनी कोणाचा?
झाडे तोडण्यासाठी रविवारी सुटीदिवशी कंत्राटदार क्रेन व कटरसह आमराई उद्यानात आला. तेथील कर्मचाऱ्यांनी सुरूवातीला त्याला अडविले. पण त्याने झाडे तोडण्यापोटी भरलेल्या रकमेची पावती दाखविली. यावेळी कर्मचाºयांनी वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधून माहिती दिली होती. त्यातच आॅफिसर्स क्लबच्या दूरध्वनीवरून झाडे तोडण्याबाबत कंत्राटदाराला दूरध्वनी आला होता, असे आयुक्तांनी सांगितले. हा दूरध्वनी कोणाचा होता? असा प्रश्न उपस्थित होतो.
जिल्हाधिकाºयांना चौकशीची विनंती
आॅफिसर्स क्लबचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. त्यांनाही वृक्षतोडीचा अहवाल पाठविला आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून महापालिकेला अहवाल द्यावा, अशी विनंती केल्याचेही आयुक्त खेबूडकर यांनी सांगितले.