आष्ट्यात कापड दुकानाला आग, दोन कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:17 AM2021-02-05T07:17:52+5:302021-02-05T07:17:52+5:30
आष्टा : येथील बी. बी. कोपर्डे या अद्ययावत कापड दुकानाला रात्री साडेअकराच्या दरम्यान शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत दोन ...
आष्टा : येथील बी. बी. कोपर्डे या अद्ययावत कापड दुकानाला रात्री साडेअकराच्या दरम्यान शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत दोन कोटीचे नुकसान झाले.
येथील शिंदे चौकानजीक अंबाबाई मंदिराजवळ मागील वीस वर्षांपासून नागेश दामोदर कोपर्डे यांचे बी. बी. कोपर्डे हे कापड दुकान आहे. रविवारी रात्री नऊच्या दरम्यान दुकान बंद केल्यानंतर रात्री साडेअकराच्या दरम्यान या कापड दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागली. कोपर्डे यांनी तातडीने आष्टा नगरपरिषद अग्निशमन दलाला माहिती दिली.
दुकानात कोट्यवधीच्या फर्निचरसह विविध प्रकारचे ड्रेस मटेरियल, साड्या, अत्याधुनिक कपडे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. आष्टा नगरपालिका, इस्लामपूर नगरपरिषद, सांगली महापालिका, राजारामबापू पाटील व हुतात्मा साखर कारखाना (वाळवा) यांच्या सात अग्निशमन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. विद्युत पुरवठा खंडित केल्याने पुढील अनर्थ टळला. आष्टा पालिका कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून रात्रभर आग विझविण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, झुंजारराव पाटील, विशाल शिंदे, शैलेश सावंत, धैर्यशील शिंदे, संभाजी माळी, नगरसेवक विकास बोरकर यांच्यासह आष्टा पालिका कर्मचारी सचिन मोरे, फरदीन आत्तार, कुमार शिंदे, लखन लोंढे, आर. एन. कांबळे, अरुण टोमके, भगवान शिंदे यांनी आग विझविली.
चौकट
चारचाकी पार्किंगमुळे अडथळे
कोपर्डे यांच्या दुकानाचा रस्ता अरुंद आहे. परिसरातील रहिवाशांनी चारचाकी पार्किंग केल्याने अग्निशमन गाड्यांना अडथळा निर्माण झाला.
कोपर्डे यांच्या दुकानात आग प्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात आलेली नव्हती. लाकडी फर्निचर व कापडामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. रात्रभर आगीचे लोट बाहेर पडत होते.
फोटो : आष्टा येथील बी. बी. कोपर्डे या कापड दुकानाला रविवारी रात्री आग लागली. या आगीत कापड दुकान बेचिराख झाले.