कऱ्हाड तील एक हजार रिक्षांमध्ये ‘अग्निशमन’ -लोकमत विशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 01:02 AM2018-04-05T01:02:32+5:302018-04-05T01:02:32+5:30
कऱ्हाड : आगीसारख्या घटनांवर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी अनेक शासकीय कार्यालय व खासगी कंपन्यांमध्ये ‘अग्निशमन यंत्र’ बसविण्यात आले आहे.
सचिन काकडे।
कऱ्हाड : आगीसारख्या घटनांवर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी अनेक शासकीय कार्यालय व खासगी कंपन्यांमध्ये ‘अग्निशमन यंत्र’ बसविण्यात आले आहे. आता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कऱ्हाडतील रिक्षा चालकांनीही पुढाकार घेतला असून, गॅस किट असलेल्या तब्बल एक हजार रिक्षांना ‘अग्निशमन यंत्र’ बसविण्यात आले आहे.
कऱ्हाड शहरात परवानाधारक तब्बल ५ हजार रिक्षा आहेत. यामध्ये गॅस किट असलेल्या सुमारे दीड हजार रिक्षा आहेत. उन्हाळ्यात गॅस किट असलेल्या रिक्षा या तापण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे अशा रिक्षांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. ज्या रिक्षांना अग्निशमक यंत्र असेल, अशा रिक्षांच्या परवान्याचेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नूतनीकरण केले जाते. गॅस किट असलेल्या रिक्षांना अग्निशमन यंत्र बसवणे बंधनकारण असताना आता स्वत: रिक्षाचालकांनी स्वत:च्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतला आहे. जवळपास एक हजार रिक्षा चालकांनी ‘अग्निशमन यंत्र’ बसविले आहे.
हाताळण्याचे मार्गदर्शनही घेतले...
शहरातील अनेक रिक्षाचालकांनी अग्निशमन यंत्र बसविण्यावर भर दिला आहे. या यंत्राचा कशा प्रकारे वापर करायला हवा, याची माहितीही अनेकांनी जाणून घेतली आहे. त्यामुळे आगीसारखी घटना घडल्यास तातडीचा उपाय म्हणून या अग्निशमन यंत्राची मोठी मदत होणार आहे, अशी माहिती शहरातील काही रिक्षा चालकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शहरातील हजारो नागरिक रिक्षाने प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही गॅस किट असलेल्या रिक्षांना ‘अग्निशमन यंत्र’ बसविले आहे. भविष्यात आगीसारख्या घटना घटल्यास आग आटोक्यात आणण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे.
- जालिंदर बुरुड, रिक्षाचालक
शहरातील रिक्षा चालकांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हाती घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. केवळ गॅस किट असलेल्या रिक्षांनाच नव्हे तर डिझेल व पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षांनाही अग्निशमन यंत्र बसविणे अत्यंत गरजेचे आहे.
- संतोष पवार, नागरिक