Sangli: तासगावात भरवस्तीत फटाक्यांचा स्फोट; प्रशासनाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 12:19 PM2023-11-07T12:19:36+5:302023-11-07T12:28:25+5:30
रात्री उशिरापर्यंत सहा अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या माध्यमातून आग आटाेक्यात आणण्याचे काम सुरू होते
तासगाव : तासगाव शहरात सोमवार पेठेत सोमवारचा आठवडा बाजार भरलेला असतानाच, नागरिकांचा गजबजाट असलेल्या सोमवार पेठेतच फटाक्यांचा साठा करून ठेवलेल्या दुमजली इमारतीस भीषण आग लागली. आगीत ही इमारत जळून खाक झाली. फटाक्यांचा स्फोट आणि आगीच्या ज्वाळांनी तासगावकर धास्तावले होते. प्रशासनाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टाळली असून रात्री उशिरापर्यंत सहा अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या माध्यमातून आग आटाेक्यात आणण्याचे काम सुरू होते. घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
तासगावातील सोमवार पेठेत कोकणे नामक व्यक्तीचे फटाके विक्रीचे दुकान आहे. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दुमजली घरातच फटाक्यांचा साठा ठेवण्यात आला होता. सोमवारी आठवडा बाजाराचा दिवस होता. फटाक्यांचा साठा करून ठेवलेल्या परिसरातच आठवडा बाजारदेखील भरतो.
नागरी वस्तीने गजबजलेल्या या परिसरातच सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास फटाक्यांच्या साठ्याला आग लागली. त्यानंतर फटाक्यांचे स्फाेट सुरू झाले. आगीत कोकणे यांची दुमजली इमारत भस्मसात झाली. फटाक्यांचे स्फाेट आणि आगीच्या उंचच उंच ज्वाळांचे लोट यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. आगीची माहिती मिळताच तासगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
तहसीलदार रवींद्र रांजणे, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सांगली महापालिका विटा नगरपरिषद तसेच चितळे दूध डेअरी अशा सहा अग्निशमन पथकांना पाचारण करण्यात आले. सहा गाड्यांच्या माध्यमातून आग आटाेक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू हाेते.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय अडचणीत असलेल्या ठिकाणातून मार्ग काढत जीव धोक्यात घालून आग आटाेक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले हाेते. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग तत्काळ आटोक्यात आली.
भर वस्तीत फटाक्यांचा स्फोट झाल्यामुळे तासगावकरांचा जीव टांगणीला लागला होता. नागरिकांत घबराटीचे वातावरण दिसून येत होते.
आग लागलेला परिसर रिकामा
फटाक्यांनी आग लागलेला परिसर पोलिस आणि पालिका प्रशासनाकडून तत्काळ रिकामा करण्यात आला. आग लागलेल्या इमारतीसह अन्य सर्व इमारतीतील नागरिकांना तातडीने घटनास्थळापासून दूर हलविण्यात आले. त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. फटाक्यांचा स्फोट झाल्याची बातमी तासगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे घटनास्थळी माेठी गर्दी झाली हाेती.