मिरजेत अतिक्रमण हटावचा फार्स
By admin | Published: December 29, 2015 11:27 PM2015-12-29T23:27:36+5:302015-12-30T00:49:35+5:30
स्टेशन रोड, रेल्वे स्थानक परिसरात कारवाई : हातगाडे, विक्रेते हटविले
मिरज : मिरजेत स्टेशन रोड, रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणे मंगळवारी हटविण्यात आली. रस्त्यावरील विक्रेते, हातगाड्या, फलक, छपऱ्या काढून अतिक्रमण हटविण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले. अतिक्रमणे हटविताना काहींचे महापालिका कर्मचाऱ्यांसोबत वादावादीचे प्रकार घडले.महापालिका सहायक आयुक्त टीना गवळी यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्टेशन रोड, रेल्वे स्थानक परिसर, हिरा हॉटेल चौकातील दुकानांसमोरील फलक व अतिक्रमणे काढली. लोखंडी छपऱ्या काढण्यासाठी कटर उपलब्ध न झाल्याने ही मोहीम दुपारनंतर थांबविण्यात आली होती. अतिक्रमणे हटविण्यास दुकानदारांनी विरोध केल्याने वादावादीचे प्रकार घडले. सोमवारी मार्केट परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली होती. मात्र मंगळवारी पुन्हा विक्रेते रस्त्यावर बसले होते. विनापरवाना बांधण्यात आलेली पक्की बांधकामे पाडण्याचे काम अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात विनापरवाना बांधकामे केली आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी पक्की बांधकामे काढण्याबाबत अद्याप आदेश दिलेले नसल्याने, रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात येत असल्याचे टीना गवळी यांनी सांगितले. शहरातील लोणी बाजार, दत्त चौक परिसरातील रस्त्यावरील भाजी बाजार, बालगंधर्व नाट्यगृह ते मालगाव वेस, गांधी चौक, शिवाजी रस्ता ते बसस्थानक, ईदगाहनगर रस्ता रुंदीकरण, पोलीस ठाणे ते हिरा हॉटेल चौकापर्यंतचे रस्ते रुंदीकरण यासह शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण गेली अनेक वर्षे रखडले आहे. रस्त्यावरील हातगाड्या व विक्रेत्यांना हटविण्याऐवजी रखडलेले प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण सुरु करण्याची नागरिकांची मागणी आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेची चौकशी केली. मात्र कारवाईसाठी कोणीही उपस्थित नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)
पोलिसांचे असहकार्य
मिरजेत अतिक्रमणे हटविण्यास जोरदार विरोध होत असल्याने महापालिकेने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. मात्र पोलिसांनी, बंदोबस्त लगेच देता येणार नाही, अशी भूमिका घेतल्याने, पोलीस अधीक्षकांकडून बंदोबस्ताची मागणी केल्याचे टीना गवळी यांनी सांगितले. पोलीस बंदोबस्ताशिवाय अतिक्रमणे काढणे कठीण असल्याने, बंदोबस्त मिळाला नाही, तर बुधवारपासून अतिक्रमणे हटविण्याची कारवाई थांबविणार असल्याचे गवळी यांनी सांगितले.