आतषबाजीत रंगली सांगली...
By Admin | Published: November 11, 2015 10:56 PM2015-11-11T22:56:50+5:302015-11-11T23:39:17+5:30
लक्ष्मीपूजन उत्साहात : बाजारपेठेत गर्दी उसळली; मोठी उलाढाल
सांगली : उत्सवाच्या निमित्ताने उत्साहाला आलेले उधाण... लक्ष दिव्यांनी लख्ख प्रकाशात उजळलेले शहर... रांगोळी, फुले आदी साहित्यांनी केलेली आरास आणि भक्तिमय वातावरणात बुधवारी सांगलीत पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले. घरोघरी तसेच व्यापारी पेठांमध्ये सायंकाळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
दीपावलीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. बुधवारी जिल्ह्यासह शहरात दिवसभर लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू होती. सकाळपासूनच पूजा साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. केळीचे खूट, नारळाच्या झावळ्या, फटाके, झेंडूच्या फुलांची खरेदी जोरात सुरू होती. सायंकाळी घरा-घरात लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू झाली. घरे, दुकाने सजविण्यात आली होती. रांगोळ्यांच्या पायघड्या घालून लक्ष्मीच्या स्वागतासाठी सारेच सज्ज होते. घरा-घरात महिला नटूनथटून लक्ष्मीच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या होत्या.
सायंकाळनंतर लक्ष्मीपूजनाचे कार्यक्रम झाले. मांगल्य व भक्तिमय वातावरणात लक्ष्मीपूजन पार पडले. त्यानंतर शहरात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. मुख्य बाजारपेठ असलेल्या मारुती रस्ता, कापडपेठ, सराफकट्टा, बालाजी चौकात व्यापाऱ्यांनी झेंडूच्या माळा, तोरण, केळीचे खूट लावून दुकाने सजविली होती. व्यापाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत विधिवत लक्ष्मीपूजन केले. लक्ष्मीपूजनासोबतच अनेक व्यापाऱ्यांनी वह्यांचेही पूजन केले. पूजा झाल्यानंतर ग्राहक, मित्रमंडळी, नातेवाईकांना तीर्थप्रसादाचे वाटप झाले. चिरमुरे, बत्तासे, पेढे, मिठाई, सुक्यामेव्याची रेलचेल दिसून आली.
औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनीही पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले. ठिकठिकाणी करण्यात आलेल्या लक्ष्मीपूजनावेळी आरती, मंत्रोच्चाराचा नाद घुमत होता. पूजेनंतर संपूर्ण शहरात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. शहरात रात्री उशिरापर्यंत ही आतषबाजी सुरूच होती. संपूर्ण आसमंत आतषबाजीने उजळून निघाला होता. सर्वत्र आनंदोत्सवाला उधाण आले होते.
शहरासह ग्रामीण भागातही लक्ष्मीपूजन उत्साहात झाले. ग्रामीण भागातही फटाक्यांचा दणदणाट सुरू होता. गुरुवारी बलिप्रतिपदा तथा दिवाळी पाडवा साजरा करण्यासाठी सारेच सज्ज झाले आहेत. (प्रतिनिधी)
फुलांची आवक वाढली : दराने केला अपेक्षाभंग
लक्ष्मीपूजन व सजावटीसाठी आवश्यक असणाऱ्या झेंडू फुलांच्या खरेदीसाठी सकाळपासून बाजारपेठेत गर्दी होती. काल, मंगळवारी झेंडूचा दर किलोला ८० ते १०० रुपये होता. शहरातील बाजारपेठेत झेंडूची आवक वाढल्याने दर कोसळले. दुपारनंतर ५० ते ६० रुपये किलो या दराने झेंडूची विक्री सुरू होती. सायंकाळी तर या दरात मोठी घसरण झाली होती. झेंडूच्या दराने शेतकऱ्यांचा मात्र मोठा अपेक्षाभंग झाला.