सांगलीतील आटुगडेवाडीत ढाब्यावर गोळीबार, मद्यधुंद तरुणांच्या दोन गटांत हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 05:30 PM2023-01-25T17:30:58+5:302023-01-25T17:32:19+5:30
‘मी सभापती आहे. गोळ्या घालीन’ अशी दिली धमकी
कोकरूड : आटूगडेवाडी-मेणी (ता. शिराळा) येथील भाऊच्या ढाब्यावर किरकोळ कारणावरून झालेल्या मारामारीनंतर शाहूवाडी तालुक्यातील माजी सभापती बबन पाटील याने हवेत चार गोळ्या झाडल्या. याप्रकरणी कोकरूड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. संशयित बबन पाटील याला अटक करण्यात आली आहे.
उंडाळे (ता. कराड) येथील जयेश जयवंत निकम (वय २६) व त्याचे मित्र आटूगडेवाडी-मेणी (ता. शिराळा) येथील खिंडीत असणाऱ्या भाऊचा ढाबा येथे जेवायला आले होते. त्याच वेळी शाहुवाडी तालुक्यातील माजी सभापती बबन ऊर्फ आनंद शंकर पाटील (रा. शिराळे वारुण, ता. शाहूवाडी) हे आपल्या समर्थकांसाेबत जेवण करण्यासाठी आले होते. ढाब्याच्या दरवाजातून आत-बाहेर जात असताना फिर्यादी जयेश निकम याचा बबन पाटील याला धक्का लागला. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली.
बबन पाटील म्हणाले, ‘मी सभापती आहे. मला धक्का काय देतोयस काय?’ यावरून दोन्ही गटातील युवक एकमेकावर धावले. प्रथम शाब्दिक चकमक, झटापट झाली. यातील काहींनी मद्यप्राशन केले हाेते. यामुळे माेठा गाेंधळ उडाला. हाणामारी सुरू झाली. यावेळी माजी सभापती बबन पाटील याने खिशातील काळ्या रंगाचे पिस्तूल काढून दमदाटी केली. हवेत चार गोळ्या झाडून दहशत निर्माण करीत ‘मी सभापती आहे. गोळ्या घालीन’ अशी धमकी दिली.
याबाबतची फिर्याद जयेश जयवंत निकम यांनी कोकरूड पोलिसात दिली असून संशयित बबन पाटील यास अटक करून पिस्तूल व चार पुंगळ्या जप्त करण्यात आल्या. घटनास्थळी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट देऊन तपासाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या प्रकरणाचा अधिक तपास सहयक निरीक्षक महेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिवाजी जाधव करत आहेत.