आयारामांमुळे प्रथमच फुलणार कमळ

By admin | Published: January 30, 2017 11:34 PM2017-01-30T23:34:42+5:302017-01-30T23:34:42+5:30

जिल्हा परिषदेत भाजपची एन्ट्री होणार : पक्षातील अंतर्गत कलहाचाही फटका बसण्याची चिन्हे

First of all, because of the dimensions of the lotus flower lily | आयारामांमुळे प्रथमच फुलणार कमळ

आयारामांमुळे प्रथमच फुलणार कमळ

Next



अशोक डोंबाळे ल्ल सांगली
राष्ट्रवादी व काँग्रेसमधून आलेल्यांवरच जिल्हा परिषद व काही पंचायत समित्यांमध्ये भाजपच्या कमळाची यंदा प्रथमच एन्ट्री होणार आहे. भाजपमधील जुन्या आणि नव्या नेत्यांमध्ये अंतर्गत कलह चालू असून, त्याचा फटकाही पक्षाला बसणार आहे.
स्थापनेपासून म्हणजे १९६२ पासून आजअखेर जिल्हा परिषदेत भाजपला प्रवेश मिळालेला नाही. भाजपपेक्षा छोटा पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिले जात असले तरी, त्यांचा १९९८ आणि २००२ च्या निवडणुकीत एक सदस्य निवडून आला होता.
भाजपचा १९९५ ला एक आमदार आणि पुढे प्रत्येकवेळी दोन ते तीन आमदार जिल्ह्यात निवडून आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून कमळ फुलले. पुढे विधानसभा निवडणुकीत तर जिल्ह्यातील आठपैकी जत, मिरज, सांगली आणि शिराळा विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले. एक खासदार आणि चार आमदार असे संख्याबळ भाजपकडे आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिले जात आहे. तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आजपर्यंत भाजपला फारसे यश मिळालेले नाही. जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांमध्ये भाजपचा एकही सदस्य नव्हता. पण, २०१७ च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये चित्र बदलण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीमधील टॉप टेनच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे ग्रामीण भागात पक्षाची मजबूत बांधणी झाल्याचे दिसत आहे. एकेकाळचे राष्ट्रवादीचे पलूस-कडेगाव तालुक्याचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या खांद्यावर सध्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्यांच्यामुळे पलूस-कडेगाव तालुक्यात भाजप खाते उघडण्याची शक्यता आहे.
जत तालुक्याने भाजपला पहिला आमदार मधुकर कांबळे यांच्या माध्यमातून दिला. त्यानंतर प्रकाश शेंडगे, सुरेश खाडे यांनी भाजपकडून नेतृत्व केले. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले विलासराव जगताप सध्या आमदार आहेत. जत तालुक्यातील गावा-गावामध्ये भाजप पोहोचला असला तरी, स्थानिक स्वराज्य संस्थेत फारसे यश आजपर्यंत मिळालेले नाही. मात्र ग्रामीण भागाची जाण आणि कार्यकर्त्यांचे जाळे ही जगताप यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे भाजपचे कमळ फुलण्याची शक्यता आहे. येथेही भाजपमध्ये जगताप आणि गोपीचंद पडळकर यांचा गट आहे. या गटांचे मनोमीलन होणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तासगाव आणि कवठेमहांकाळचे नेतृत्व सध्या खासदार संजयकाका पाटील एकहाती सांभाळत आहेत. दोन्ही तालुक्यात कमळ फुलविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीमधील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्याचा धूमधडाकाच त्यांनी लावला आहे. या आयारामांवरच, कमळ फुलणार की कोमेजणार, हे येत्या महिन्यात दिसणार आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे भाजपमध्येच आहेत. पण, संजयकाका पाटील यांच्याशी त्यांचे जुळत नसल्यामुळे त्यांनी स्वाभिमानी विकास आघाडी स्थापन केली आहे. त्या माध्यमातून कवठेमहांकाळ, मिरज पूर्व, तासगाव तालुक्यातील काही जागा लढविणार आहेत. याचा फटका भाजपलाच बसण्याची चिन्हे आहेत.
मिरज तालुक्यात भाजपचे आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ या दोन आमदारांसह खासदार संजयकाका पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे गट आहेत. मिरज तालुक्यात म्हणावा तेवढा भाजपचा प्रभाव दिसत नाही. कवलापूर, बुधगाव गटावर भाजपने सध्या लक्ष केंद्रित केले आहे. आमदार खाडे यांनी मिरज पूर्व भागातील काही जागा निवडून आणण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसमधील काही नेत्यांना भाजपमध्ये खेचण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत.
शिराळा, वाळवा तालुक्यात आमदार शिवाजीराव नाईक यांच्या माध्यमातून भाजपला चांगले नेतृत्व मिळाले आहे. पण, त्यांना प्रत्येकवेळी मंत्रीपदापासून दूर ठेवल्यामुळे, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘जिल्हा परिषदेची सत्ता द्या, नाईकांना मंत्री करतो’, असे म्हणून पुन्हा कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. कारण, यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही, ‘नाईकांना आमदार करा, मी मंत्री करतो’, असे सांगत कार्यकर्त्यांना आशावादी ठेवले होते. तेही आश्वासन भाजपच्या नेतेमंडळींनी पाळले नाही.
तरीही नाईक यांनी शिराळा मतदार संघातील जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी राजकीय डावपेच आखले आहेत. राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या कुटुंबातील एक गट फोडून भाजपमध्ये खेचला आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती उदयसिंह नाईक यांच्या घरातील उमेदवार मांगले गटातून उतरविण्याची रणनीती आ. नाईक यांनी आखली आहे.
वाळवा तालुक्यातही आ. नाईक यांनी राष्ट्रवादीविरोधी सर्व पक्षांना एकत्र करून विकास आघाडी बनवून आमदार जयंत पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. भाजपची स्वतंत्र ताकद फारशी नाही. आ. नाईक यांच्या प्रयत्नामुळेच येथे भाजप खाते खोलण्याची शक्यता दिसत आहे.
खानापूर-आटपाडी तालुक्यात खासदार संजयकाका पाटील आणि गोपीचंद पडळकर यांचे नेतृत्व मानणारे स्वतंत्र गट आहेत. संजयकाका पाटील आणि पडळकर या दोन नेत्यांचेच सूर जुळत नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते सैरभैर आहेत. दोन नेत्यांच्या संघर्षामुळे भाजपच्या उमेदवारांची येथे कसोटी लागणार आहे. प्रत्येक तालुक्यातून भाजपने ताकद लावली असली तरी, नेत्यांमधील समन्वयावरच यशाचे गणित अवलंबून आहे.

Web Title: First of all, because of the dimensions of the lotus flower lily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.