राज्यात पहिली अंध वारकऱ्यांची पायी दिंडी; मिरजेतून पंढरपूरला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 09:18 PM2019-10-31T21:18:23+5:302019-10-31T21:21:00+5:30
आम्ही स्पर्शाने व अंतर्मनाने विठ्ठलाचे दर्शन घेणार असल्याचे दिंडीत सहभागी अंध वारकºयांनी सांगितले. दिंडीत मिरजेतील दावल शेख यांच्यासह सहा मुस्लिम अंध वारकरी सहभागी आहेत. दिंडीचे पूजन आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
मिरज : कार्तिक एकादशीसाठी राज्यातील पहिली अंध वारकऱ्यांची पायी दिंडी मिरजेतून पंढरपूरला रवाना झाली. शिरोळचे आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याहस्ते या दिंडीचे पूजन करण्यात आले.
राज्यातून लाखो भाविक कार्तिक एकादशीसाठी पंढरपूरला पायी दिंडीने विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. लांबवर पायी प्रवास करून पंढरपुरात पोहोचलेल्या अनेक वारक-यांना दिवसभर रांगेत उभे राहूनही विठ्ठलाचे दर्शन मिळत नाही. मात्र विठ्ठलाच्या पंढरीत पोहोचल्याचे समाधान मिळते. पंढरपूरपर्यंत शेकडो किलोमीटर लांबचा पायी प्रवास करूनही, आपल्याला मंदिराच्या गाभा-यातूनही विठ्ठलाचे दर्शन यादृष्टीने घेता येणार नाही याची माहिती असतानाही, त्याच जोशाने पायी दिंडीतून विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन राज्यातील पहिली अंध वारक-यांची दिंडी मिरजेतून कार्तिक एकादशीसाठी पंढरपूरला रवाना झाली.
आम्ही स्पर्शाने व अंतर्मनाने विठ्ठलाचे दर्शन घेणार असल्याचे दिंडीत सहभागी अंध वारक-यांनी सांगितले.
दिंडीत मिरजेतील दावल शेख यांच्यासह सहा मुस्लिम अंध वारकरी सहभागी आहेत. दिंडीचे पूजन आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. मिरजेतील स्वरगंधार सांस्कृतिक मंच व सर्वधर्मसमभाव अपंग सेवा संस्थेचे प्रवीण पाखरे, यशवंत जाधव, दावल शेख यांनी दिंडीचे नियोजन केले आहे.
राज्यातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे व विदर्भातून आलेले ३५ अंध वारकरी दिंडीत सहभागी आहेत.मिरजेतील गर्डर विठ्ठल मंदिरातून या दिंडीला प्रारंभ झाला. यावेळी टाळ-मृदंगाच्या तालावर अंध वारकरी विठ्ठलाची स्तुती गात नाचत होते. ९ नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशीला हे सर्वजण पंढरपुरात पोहोचणार आहेत. दिंडीसोबत राहुल सोमशेट्टी, मिलिंद कुलकर्णी, ओंकार जाधव, गणेश जगदाळे हे स्वयंसेवक दिंडीला पंढरीचा मार्ग दाखविणार आहेत.
राज्यातून अनेक पायी दिंड्या निघतात. मात्र अंधांची दिंडी प्रथमच अत्यंत भक्तिभावाने पायी पंढरपूरला जात आहे. मिरजेतील नामदेव मंदिर येथून नागरिकांनी अंध वारक-यांना शुभेच्छा दिल्या.