साळशिंगेत साकारले राज्यातील पहिले ‘पुस्तकांचे घर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 11:36 PM2018-12-04T23:36:58+5:302018-12-04T23:37:12+5:30
दिलीप मोहिते । लोकमत न्यूज नेटवर्क विटा : ग्रामीण भागात शिक्षण आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी साळशिंगे (ता. ...
दिलीप मोहिते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : ग्रामीण भागात शिक्षण आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी साळशिंगे (ता. खानापूर) येथील रेवणसिध्द शहाजी कदम या युवकाने कुटुंबियांच्या मदतीने राज्यातील पहिले ‘पुस्तकाचं घर’ साकारले आहे. शालेय पुस्तकांसह बालकथांपासून स्पर्धा परीक्षेपर्यंतची सुमारे एक हजारावर पुस्तके मोफत उपलब्ध करून देऊन, या कुटुंबाने घराचे रूपांतर वाचनालयात केले आहे.
साळशिंगेचा रेवणसिध्द कदम कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठात बी. ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, तसेच या मुलांसह लोकांना विविध क्षेत्रांची माहिती व्हावी, या हेतूने युवा फौंडेशनच्या माध्यमातून आणि कुटुंबियांच्या मदतीने रेवणसिध्दने ‘पुस्तकाचं घर’ तयार केले आहे. त्याने सामाजिक चळवळीचे प्रणेते डॉ. प्रकाश आमटे यांची प्रेरणा घेतली आहे. गावातील लोकांना व गरजू विद्यार्थ्यांना कदम कुटुंबाने सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ होत आहे. येथून पुस्तक घरी घेऊन जाऊन वाचण्याची सोय करण्यात आली आहे.
प्रत्येक रविवारी नवीन पुस्तक देऊन दुसºया रविवारी ते जमा करून घ्यायचे व त्याचवेळी दुसरे पुस्तक द्यायचे, असा नित्यक्रम सुरू आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
दुष्काळी खानापूर तालुक्यातील साळशिंगे या खेडेगावात राज्यातील पहिले ‘पुस्तकाचं घर’ तयार झाले आहे. आता या घरात पुस्तकांची संख्या वाढविण्याचा निश्चय करण्यात आला आहे.
युवकांना सशक्त बनविण्याचा संकल्प
युवकांनी धैर्याने आणि शौर्याने राष्टÑनिष्ठा, बंधुभाव, समानता या मूल्यांची जोपासना करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. भरकटलेल्या युवकांना सशक्त, साहसी, निर्भय आणि चारित्र्यसंपन्न बनविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठीच ‘पुस्तकाचं घर’ तयार केल्याचे रेवणसिध्द कदमने सांगितले.