सांगली जिल्ह्यात महिलांनी चालविले पहिले चारा दान केंद्र -: आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथे सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 02:16 PM2019-05-22T14:16:11+5:302019-05-22T14:17:43+5:30
दाट होत चाललेले दुष्काळाचे ढग...पाणी, चाऱ्याविना डोळ्यातून बरसणाऱ्या धारा अशा वातावरणात ओढावलेल्या नैसर्गिक संकटाशी सामना करीत असलेल्या लाखो दुष्काळग्रस्तांचे लक्ष आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथील चारा दान केंद्राने वेधले आहे. चार व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, स्वछता व्यवस्थापन, जमा खर्चाचे नियोजन अशा सर्व गोष्टी महिलांच्या हाती आहेत
सांगली : दाट होत चाललेले दुष्काळाचे ढग...पाणी, चाऱ्याविना डोळ्यातून बरसणाऱ्या धारा अशा वातावरणात ओढावलेल्या नैसर्गिक संकटाशी सामना करीत असलेल्या लाखो दुष्काळग्रस्तांचे लक्ष आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथील चारा दान केंद्राने वेधले आहे. चार व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, स्वछता व्यवस्थापन, जमा खर्चाचे नियोजन अशा सर्व गोष्टी महिलांच्या हाती आहेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चाललेल्या घुटुगडे वस्तीवरील या केंद्राने तिनशेहून अधिक जनावरांचे पालनपोषण सुरू केले आहे.
जांभुळणी येथे उगम व बळीराजा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दि ६ मे २0१९ रोजी 'पुण्यकर्म' चारा दान केंद्र सुरू झाले. जनावरांच्या मालकांच्या नावाने तीनशेच्या आसपास जनावरांची भरती झाली. प्रत्यक्ष चारा वाटप सुरू झाले. मालकाचे नाव पुकारल्याबरोबर प्रत्येक वेळी कोणीतरी महिला पुढे येऊन चारा घेऊन जात होती. कुटुंबप्रमुख म्हणून नाव पुरुषाचे आणि चारा न्यायला येते त्या घरातली स्त्री. हे चित्र येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड. संदेश पवार यांनी अनुभवले. सर्वच्या सर्व जनावरांचे मालक त्या घरचे पुरुष आहेत आणि इथे जनावरांचे पालनपोषण व काळजी घरची महिला करीत आहे. वास्तविक ग्रामीण भागात घर संभाळण्याबरोबरच घरातील पशुधन सांभाळण्याचा ताण महिलांवरच असतो. जांभुळणीतल्या चारा छत्रात डोंगर-दऱ्यातून चार पाच किलोमीटर पायपीट करून दररोज जनावरांना महिलाच घेऊन येत होत्या. त्यांना प्रचंड त्रास सोसावा लागतोय हे लक्षात येताच या महिलांना जवळ सोयीचे पडेल असे घुटुगडे वस्ती वरचे दुसरे ठिकाण पवार यांनी निवडले आणि त्या ठिकाणी दुसरे चारा छत्र फक्त महिलांनी पुढाकार घेऊन सुरू केले.
या चारा छत्रात जनावरांची नोंद संबंधित महिलेच्या नावावरच घेतली गेली आहे. या केंद्रात चारा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, स्वछता व्यवस्थापन, जमा खर्च आदी सर्व जबाबदाऱ्या केवळ महिला सांभाळत आहेत. या ठिकाणी जवळजवळ ८0 ते १00 जनावरे चारा खाण्यासाठी दररोज दाखल होत असून चारा छत्राचे नियोजन स्थानिक महिला चोखपणे करत आहेत. या चारा केंद्रासाठी दररोज पाच हजार लिटर पाणी पुरवण्याची महत्वपूर्ण जबाबदारी वैशाली दत्तू मुढे यांनी घेतलेली असून जनाबाई एकनाथ घुटुगडे यांनी चारा व्यवस्थापन, मंगल पांडुरंग जुगदर यांनी स्वछता, ताई दत्तात्रय घुटूगडे यांनी जमा-खर्च, हिराबाई दादा घुटुगडे यांनी देखरेख,.वैशाली शहाजी घुटुगडे, सुवर्ण प्रकाश तरंगे यांनी मदतगार म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
महिलांच्या कर्तबगारीचे कौतुकच!
याविषयी संदेश पवार म्हणाले की, अस्मानी संकटात खंबीरपणे संसार वाचवणाºया महिलांच्या कर्तबगारीचे कौतुक व्हावे, त्यांच्या धडपडीचा सन्मान व्हावा यासाठी सुवर्णा खंडेलवाल-जोशी यांच्या प्रेरणेतून व भाई संपतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिनव चारा छत्र यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. संवेदनशील लोकांनी यासाठी साठी साथ द्यावी.
थोर महिलांचे स्मरण
विशेष म्हणजे या ठिकाणच्या निवाऱ्यांना राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, कल्पना चावला यासारख्या थोर महिलांची नावे दिली आहे. त्यांच्या कार्याचा सचित्र सन्मान यानिमित्ताने करण्यात आला आहे. त्यामुळे हे केंद्र अधिक लक्षवेधी ठरले आहे.