पहिली ते चौथीची मुले घरात कंटाळली; त्यांना हवी शाळा, पालकांना ना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:24 AM2021-02-13T04:24:47+5:302021-02-13T04:24:47+5:30
सांगली : राज्यात कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे शासनाने सहावी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे पहिली ...
सांगली : राज्यात कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे शासनाने सहावी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये आपली शाळा कधी सुरू होणार, या बाबतची त्यांच्या मनामध्ये मोठी उत्सुकता लागली आहे. हे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला कंटाळले असून त्यांना शाळेतील आपल्या मित्रांबरोबर कधी खेळायला मिळेल, याबाबत त्यांना शाळेची ओढ लागली आहे. दुसरीकडे काेराेनाच्या धास्तीमुळे पालक मात्र आजही आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार ५९८ आणि खासगी प्राथमिकच्या सहाशे शाळा आहेत. पहिली ते चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एक लाख ६९ हजार ४२६ संख्या आहे. या विद्यार्थ्यांच्या शाळेला गेल्या मार्च २०२० पासून सुट्टी मिळाली असून आजअखेर त्यांच्या शाळेची घंटा वाजलीच नाही. सध्या हे विद्यार्थी शाळेला नव्हे तर घरात थांबायला कंटाळले आहेत. या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कधी एकदा शाळेत जायची संधी मिळेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आम्ही काही विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्यानंतर त्यांना शाळेत जायचे आहे. पण, कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे ते नाराज आहेत. पालक मात्र आजही आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तरीही आम्ही आमच्या मुलाला या वर्षी शाळेत पाठविणारच नाही, अशाच पालकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही पालकांनी तर आमच्या मुलांचे एक वर्ष शैक्षणिक नुकसान झाले तर चालेल, पण आम्ही मुलांना शाळेत पाठविणार नाही, यावर काही पालक ठाम आहेत.
मुलांना हवी शाळा...
कोट
ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आला आहे. शाळेत मित्र-मैत्रिणी भेटतात. खेळायलाही मिळते. शिक्षक शिकवतात तेही चांगले समजते. यामुळे ऑनलाईन पेक्षा शाळेतच गेलेले बरे. कोरोना आता कमी झाल्यामुळे शासनाने शाळा सुरू कराव्यात.
-शुभम् पाटील, विद्यार्थी चौथी.
कोट
शाळेत खूप मजा येते. मला शाळेला जाण्यास खूप आवडते. पण, कोरोनामुळे शासनाने शाळा बंद केल्यामुळे आम्हाला जाता येत नाही. काेरोना कमी झाला असल्यामुळे शाळा सुरू झाल्या पाहिजेत.
-अवनी उदगीरकर, विद्यार्थिनी तिसरी.
पालकांना चिंता...
कोट
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असे वाटत असले तरीही कोरोनाचे संकट पूर्ण संपले नाही. यामुळे या शैक्षणिक वर्षात माझ्या मुलीला मी शाळेत पाठविणार नाही. शाळा ऑनलाईन खूप चांगल्या पध्दतीने अभ्यास आणि परीक्षाही घेत आहे. यामुळे तेच शिक्षण या वर्षासाठी पुरेसे आहे.
-रंजीता पाटील, पालक.
कोट
दोन महिन्यासाठी पहिली ते पाचवीचे वर्ग शासनाने सुरू करू नयेत. ऑनलाईनच शिक्षण चालू ठेवावे. लहान मुले असल्यामुळे शाळेत कोरोनाबाबत दक्षता घेतली जाईल, याची खात्री नाही. यामुळे शासनाने शाळा सुरू करण्याची गडबड करू नये.
-प्रभाकर कुलकर्णी, पालक.
चौकट
जिल्ह्यात शाळांची संख्या : २३४९
पहिली ते चाैथी : १६९४२६