Independence Day (12590) साक्षीदारांच्या हृदयात कोरला पहिला स्वातंत्र्य दिन : सांगली जिल्ह्यातील स्फूर्तिदायी उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 09:32 PM2018-08-14T21:32:00+5:302018-08-14T21:59:26+5:30
स्वातंत्र्याची उर्मी बाळगून धगधगते पर्व नोंदविणाऱ्या क्रांतिकारकांची भूमी असलेल्या सांगली जिल्ह्यात पहिला स्वातंत्र्य दिन हा अत्यंत मंतरलेला, भारावलेला होता. सांगली, मिरज, तासगाव याठिकाणी झेंडावंदनासह मिरवणुका, खाऊ वाटप अशाप्रकारच्या
अविनाश कोळी
सांगली : स्वातंत्र्याची उर्मी बाळगून धगधगते पर्व नोंदविणाऱ्या क्रांतिकारकांची भूमी असलेल्या सांगली जिल्ह्यात पहिला स्वातंत्र्य दिन हा अत्यंत मंतरलेला, भारावलेला होता. सांगली, मिरज, तासगाव याठिकाणी झेंडावंदनासह मिरवणुका, खाऊ वाटप अशाप्रकारच्या कार्यक्रमांनी एक स्फूर्तिदायी उत्सवही साजरा करण्यात आला होता. स्वातंत्र्यसेनानी बापूसाहेब अण्णासाहेब पाटील आणि माधवराव माने या दोन साक्षीदारांच्या हृदयात आजही त्या दिवसाच्या आठवणी ताज्या आहेत.
क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, वसंतदादा पाटील, हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे यांच्यासह हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या चळवळीचा गाजावाजा देशभर झाला. म्हणूनच क्रांतिकारकांच्या या भूमीतील पहिला स्वातंत्र्य दिनही तसा भारावलेला आणि मंतरलेलाच होता. सांगलीच्या राजवाड्यात, मिरजेच्या किल्ला भागात आणि तासगावच्या राजवाड्याच्या पिछाडीस झालेल्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या आठवणी साक्षीदार असलेल्या दोघा स्वातंत्र्यसेनानींच्या हृदयात आजही तितक्याच ताज्या आहेत.
सांगलीतील बापूसाहेब पाटील म्हणाले की, सांगलीतील पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ््यास नागरिकांसह काही स्वातंत्र्यसैनिकही उपस्थित होते. त्यावेळी बºयाच स्वातंत्र्यसैनिकांची अद्याप तुरुंगातून सुटका व्हायची होती. स्वातंत्र्याचा पहिला सोहळा सांगलीतील राजवाडा चौकातील दरबार हॉलसमोर झाला होता. याठिकाणी चिंतामणराव पटवर्धन (दुसरे) यांनी पहिल्यांदा याठिकाणी तिरंगा फडकवला होता. यावेळी माझ्यासह स्वातंत्र्यसेनानी वसंतदादा पाटील, डॉ. देशपांडे, जयराम कुष्टे, बाळकृष्ट बुकटे, तुकाराम रखमाजी चौगुले, पुरंदर शेटे, दीपचंद व्होरा, आर. पी. पाटील यांच्यासह अनेक सेनानी उपस्थित होते.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माधवराव माने म्हणाले की, मला तासगावमधील झेंडावंदनाचा तो दिवस आणि जागा स्पष्टपणे आठवते. तासगावच्या राजवाड्याच्या पिछाडीस मोठे मैदान होते. त्याठिकाणी झेंडावंदन झाले होते. त्यावेळी शालेय मुलांना खाऊवाटप करण्यात आले होते. शालेय मुलांची एक मिरवणूकही तासगाव शहरातून निघाली होती. स्वातंत्र्यानंतर लगेचच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक मोर्चाही तासगाव शहरात काढण्यात आला होता.
मिरज संस्थानातही पहिला स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला होता. शहरात पूर्वी किल्ला भागात असलेल्या पोलीस परेड मैदानावर हा कार्यक्रम झाला. त्यावेळी संस्थानचे नारायणराव तात्यासाहेब पटवर्धन राजे यांच्याहस्ते राष्टÑध्वज फडकविण्यात आला होता. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने मिरजेतील लक्ष्मी मार्केटला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये अशापद्धतीने झेंडावंदन व स्वातंत्र्याच्या उत्सवाचा आनंद स्वातंत्र्यसैनिकांसह जनतेने लुटला होता.