डांगे महाविद्यालयात देशातीलपहिले मोटार प्रशिक्षण केंद्र
By admin | Published: November 6, 2015 11:31 PM2015-11-06T23:31:45+5:302015-11-06T23:38:03+5:30
शेखर गायकवाड : प्रशासनाचा प्रयोग; आज उद्घाटन
सांगली : जिल्हा प्रशासन व आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने आष्टा (ता. वाळवा) येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात मोटार प्रशिक्षण केंद्र सुरु केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व आरटीओ दशरथ वाघुले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. देशातील हा पहिला प्रयोग असून, प्रशिक्षण केंद्राचे शनिवारी सकाळी अकरा वाजता उद्घाटन केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, वाहनांची संख्या जशी वाढत आहे, तशी अपघातांची संख्याही वाढत आहे. १८ ते ३५ वयोगटातील तरुण अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. महाविद्यालयात असतानाच विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती, वाहन कसे चालवावे, याची माहिती मिळावी, यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयात हा उपक्रम राबविण्याची संकल्पना चर्चेतून पुढे आली होती. अॅटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालयात हा उपक्रम राबविला, तर तो परिणामकारक ठरणार आहे. यासाठी डांगे महाविद्यालयाची निवड केली. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे व सचिव अॅड. चिमण डांगे यांच्यासमोर ही संकल्पना मांडण्यात आली. त्यांनीही लगेच होकार दिला. त्यानुसार देशातील पहिले मोटार प्रशिक्षण केंद्र डांगे महाविद्यालयात सुरु होत आहे.
ते म्हणाले महाविद्यालयातील प्रयोगशाळेत मोटार प्रशिक्षणासाठी लागणारी यंत्रसामग्री, अवजारे व भित्तीचित्रे आणि प्रशिक्षकांची उपलब्धता असते. त्यामुळे प्रशिक्षण केंद्रात फारशी अडचण भासणार नाही. डांगे यांच्यासमोर संकल्पना मांडल्यानंतर त्यांनी केवळ २५ दिवसात सर्व तयारी पूर्ण केली. प्रशिक्षणासाठी दोन वाहने खरेदी केली. वाहन चालविण्याचा सराव करण्यासाठी नवीन सिम्युलेटर यंत्र बसविले आहे. तीस दिवसांचे हे प्रशिक्षण असणार आहे. विशेषत: मुलींनाही याचा फायदा होणार आहे.
डांगे महाविद्यालयात शनिवारी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनास कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा, जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे आदी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
लाखो विद्यार्थ्यांना फायदा
दशरथ वाघुले म्हणाले, राज्यात ३६६ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यामध्ये बारा लाखाहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात हा उपक्रम सुरु झाला, तर लाखो विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, वाहन कसे चालवावे, याचे प्रशिक्षण मिळेल. महाविद्यालयीन जीवनातच याचे धडे मिळाल्याने, अपघाताला आळा बसेल. तसेच या विद्यार्थ्यांनी समाजातील चार लोकांचे प्रबोधन केले, तर फार मोठी क्रांती घडू शकते.