सांगलीत पहिले पंचतत्त्व साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:25 AM2021-01-21T04:25:09+5:302021-01-21T04:25:09+5:30
सांगली : जल, अग्नी, पृथ्वी, वायू आणि आकाश या पंचमहातत्त्वांचे महत्त्व आणि माहात्म्य समाजापर्यंत नेण्यासाठी श्री महाराज पंचतत्त्व सेवा ...
सांगली :
जल, अग्नी, पृथ्वी, वायू आणि आकाश या पंचमहातत्त्वांचे महत्त्व आणि माहात्म्य समाजापर्यंत नेण्यासाठी श्री महाराज पंचतत्त्व सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सांगलीत पहिल्यांदाच पंचतत्त्व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाळ रोडवरील पंचतत्त्व मंदिर येथे दुपारी तीन वाजता हे संमेलन होणार असल्याचे पोळ यांनी सांगितले.
शनिवार, २३ जानेवारी रोजी होणाऱ्या संमेलनामध्ये पंचतत्त्व पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पोळ यांनी सांगितले की, जल, अग्नी, पृथ्वी, वायू आणि आकाश या पंचमहातत्त्वांची नव्याने ओळख व्हावी, त्याबाबतचा अभ्यास होऊन त्याचा व्यक्ती आणि समाज कल्यासाठी उपयोग करून घेता यावा, यासाठी साहित्यिकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. यासाठीच या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने पंचतत्त्व सेवा पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे. आकाशदेवता रंगभूमी पुरस्कार संपत कदम यांना, अग्निदेवता समाजसेवा पुरस्कार अर्चना मुळे यांना, वायुदेवता आरोग्य सेवा पुरस्कार महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांना, जलदेवता साहित्य सेवा पुरस्कार सचिन पाटील यांना, तर पृथ्वीदेवता वसुंधरा सेवा पुरस्कार अॅनिमल राहतचे कार्यकर्ते कौस्तुभ पोळ यांना प्रदान करण्यात येणार आहे. संमेलनास अॅड. श्याम जाधव, विजय कडणे, प्रा. भरतेश्वर पाटील, मुकुंद पटवर्धन, कुलदीप देवकुळे आदी उपस्थित राहणार आहेत.