मूळस्थानची पालखी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:11 PM2017-10-01T23:11:47+5:302017-10-01T23:11:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : सांगली जिल्ह्यातील विटा येथे सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि जातीय सलोखा जोपासणाºया एकाच देवाच्या दोन पालख्यांच्या शर्यतीचा नेत्रदीपक सोहळा शनिवारी विजयादशमीदिवशी विटा येथे चांगलाच रंगला. या पालखी शर्यतीत मूळस्थान श्री रेवणसिध्द देवाच्या पालखीने विट्याच्या श्री रेवणसिध्द देवाच्या पालखीस पाठीमागे टाकून शिलंगण मैदानात धाव घेत प्रथम क्रमांक पटकावला.
विटा येथे विजयादशमीनिमित्त मूळस्थान श्री रेवणसिध्द व विटा येथील श्री रेवणसिध्द या देवांच्या पालखी शर्यतींचे आयोजन केले होते. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा कायम राखण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता श्री काळेश्वर मंदिरापासून पालखी शर्यतीस सुरूवात झाली. येथील गांधी चौकातून दोन्ही पालख्या खानापूर रोडवरील शिलंगण मैदानाकडे झेपावल्या. मात्र विटा बॅँकेसमोर दोन्ही बाजूच्या भाविकांनी पालख्या अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या ठिकाणी पालख्या काही सेकंदासाठी थांबल्या. त्यातून सावरत विटा रेवणसिध्दच्या पालखीने धावण्याचा वेग घेतला.
विटा बसस्थानक, साई रूग्णालय, खानापूर नाक्यापर्यंत विटा व मूळस्थानच्या पालखीत मोठे अंतर होते. परंतु, सर्वात पुढे असलेली विट्याच्या श्री रेवणसिध्दची पालखी खानापूर नाक्यावर भाविकांनी रोखली. तोपर्यंत मूळस्थानच्या पालखीने शिलंगण मैदानात धाव घेऊन पहिला क्रमांक पटकाविला.
यावेळी ‘श्री नाथ बाबांच्या नावानं चांगभलं.. श्री रेवणसिध्द देवाच्या नावानं चांगभलं..’चा गजर करीत भाविकांनी जल्लोष केला. त्यानंतर शिलंगण मैदानात उभ्या करण्यात आलेल्या सुमारे वीस फूट उंचीच्या रावणाचे दहन करण्यात आले. यावेळी भाविकांनी एकमेकांना आपट्याची पाने देऊन सीमोल्लंघन केले.
विटा येथे शनिवारी हा नेत्रदीपक पालखी सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. शनिवारी पालखी शर्यतीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. विटा येथे विजयादशमीचा हा सोहळा संपूर्ण महाराष्टÑात प्रसिध्द आहे.