इस्लामपुरात स्मशानभूमीत भरले पहिले कविसंमेलन
By admin | Published: May 12, 2017 11:48 PM2017-05-12T23:48:32+5:302017-05-12T23:48:32+5:30
इस्लामपुरात स्मशानभूमीत भरले पहिले कविसंमेलन
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जगाला शांततेचा संदेश देत असताना, अंधश्रध्दा नाहीशी व्हावी आणि मानव निसर्गवादी बनावा, निर्भीड बनावा यासाठी भगवान गौतम बुध्दांनी जगाला अनेक तत्त्वे दिली. निसर्गवादाबरोबर मानवतावादही त्यांनीच दिला. बुध्द विचाराने जगाला नवी दिशा दिली, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सूरज चौगुले यांनी केले.
येथील लोकराज्य विद्या फौंडेशनच्यावतीने गौतम बुध्दांच्या जयंतीनिमित्त कापूसखेड नाका येथील स्मशानभूमीत आयोजित पहिल्या परिवर्तनवादी कविसंमेलनात ते बोलत होते. स्मशानभूमीत आयोजन होणारे हे पहिलेच कविसंमेलन ठरल्याचे ‘लोकराज्य’चे संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले. माजी नगरसेवक विजय कुंभार अध्यक्षस्थानी होते.
कुंभार म्हणाले की, स्मशानभूमी हे आयुष्याला पूर्णविराम देणारे ठिकाण आहे. मात्र लोकराज्यमुळे स्मशानभूमी परिवर्तनाचे व्यासपीठ बनतील. समाजाने गौतम बुध्दांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे.
रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव अरुण कांबळे, प्रा. रामचंद्र घुले, सागर मलगुंडे, अमित कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. कविसंमेलनात बजरंग गावडे यांनी ‘स्मशानातून स्मशानाकडे जाताना अखेर निराशा झाली, प्रेतासमोर शितोंडी धरताना परकी सारी आपली झाली’ ही कविता सादर केली. डॉ. मीनाक्षी नांगरे, रवी बावडेकर, भानुदास आंबी, सुधीर बंडगर, राजेंद्र शिंदे, विजय जाधव, पी. व्ही. मुळे, चंद्रकांत कणेरे, रामचंद्र गलांडे यांनीही कविता सादर केल्या.
यावेळी नगरसेवक अमित ओसवाल, प्रा. डॉ. जयवंत खरात, पोपट कोळेकर, सागर चव्हाण, अशोक पाटील, प्रा. अरुण घोडके, निरंजन पाटील, वैभव खोत, विकास वाघमोडे, विवेक तांदळे, विनोद राठोड, आकाश कुचीवाले, विवेक जगताप, ऋषिकेश पाटील उपस्थित होते. मानसिंग ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. सतीश मोरे यांनी आभार मानले.