सांगलीत मोडी लिपीतील राज्यातील पहिली भित्तीपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 03:22 PM2019-02-21T15:22:47+5:302019-02-21T15:25:56+5:30
सांगली येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. मोडी लिपीत भित्तीपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज्यातील पहिले महाविद्यालय आहे.
सांगली : येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. मोडी लिपीत भित्तीपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज्यातील पहिले महाविद्यालय आहे.
प्रत्येक महाविद्यालयात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या विषयांची भित्तीपत्रिका केली जाते. गरवारे महाविद्यालयात मात्र, इतिहास विभागाच्या वतीने मोडी लिपीतील भित्तीपत्रिका करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून उलगडून दाखविण्यात आला.
प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाच्या प्रा. उर्मिला क्षीरसागर आणि मोडीतज्ञ मानसिंगराव कुमठेकर यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूंची माहिती सांगणारे लेख मोडी लिपीतून लिहिले.
शिवाजी महाराजांचे शेती विषयक धोरण, आरमार, विविध किल्ले, त्यांचे धार्मिक धोरण, शिवकालीन अर्थकारण, शिवकालीन खेळ अशा विविध विषयावर मोडी लिपीत लेख लिहून ते आकर्षकरित्या मांडण्यात आले. या भित्तीपत्रिकेला 'शिवस्मरण' असे समर्पक नावही देण्यात आले.
मोडी लिपी शिक्षक मानसिंगराव कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपना निंबाळकर, प्राजक्ता जाधव, स्वाती घोडके, संस्कृती पाटील, धनश्री चौगुले, अश्विनी पवार, प्रज्ञा सपकाळ, लीना पाटील, प्रतिक्षा पाटील, पद्मजा मिरजकर, वैष्णवी होनराव, फिजा शेख, स्मितल वाघमोडे, सुवर्णा मराठे, शोभा संचेती, स्वरा मराठे, तेजस्वी कांबळे, प्रतिक्षा कांबळे, अमृता कोळी, सौ. दीपाली माने, सुचित्रा गोलंगडे, सोनम मडके यांनी हे मोडी लिपीतील लेख लिहले.
भित्तीपत्रिकेच्या उद्घाटनावेळी विद्यार्थिनींनी रांगोळी रेखाटली तीही मोडी लिपीतील अक्षरांचीच. विद्यार्थिनींनी मोडी लिपीतून केलेलं हे 'शिवस्मरण' छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना देणारे ठरले.
या भित्तीपत्रकाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्रा. उर्मिला क्षीरसागर, प्रा. आर. जी. देशपांडे, प्रा. एन. जी. काळे, प्रा. लीना पाटील, प्रा. आर. बी. पाटील उपस्थित होते.