सांगलीतील कृष्णा नदी काठावर परदेशी पक्ष्यांचा किलबिलाट, आमणापुरात 'करकरा क्रोंच' पक्ष्याचे प्रथमच दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 01:51 PM2022-11-14T13:51:57+5:302022-11-14T15:18:15+5:30

मीटरभर उंचीचा करकरा क्रोंच हा पक्षी पाकिस्तान, चीन, तिबेटसह मंगोलियामधून एव्हरेस्ट पार करून येतो.

First sighting of the 'Karkara Cronch' bird at Amanpur on the bank of Krishna river in Sangli | सांगलीतील कृष्णा नदी काठावर परदेशी पक्ष्यांचा किलबिलाट, आमणापुरात 'करकरा क्रोंच' पक्ष्याचे प्रथमच दर्शन

सांगलीतील कृष्णा नदी काठावर परदेशी पक्ष्यांचा किलबिलाट, आमणापुरात 'करकरा क्रोंच' पक्ष्याचे प्रथमच दर्शन

googlenewsNext

शरद जाधव

भिलवडी : पलूस तालुक्यातील आमणापूर परिसरातील कृष्णाकाठी प्राणी व पक्षी जीवन बहरत आहे. यंदाच्या हिवाळ्यात रुबाबदार अशा परदेशी पाहुण्या पक्षाच्या दोन जोड्या लक्षवेधक ठरल्या आहेत. सांगली जिल्ह्यात प्रथमच करकरा क्रोंच पक्ष्याची गेल्या दोन दिवसांत नोंद झाली आहे. आमणापूर येथील पक्षिप्रेमी संदीप नाझरे यांनी याबाबत संशोधन करून ही माहिती दिली.

पलूस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णाकाठावरील कोंडार परिसरात सध्या पक्ष्यांची शाळा भरली आहे. उथळ पाण्यावरील पहाटेच्या धुक्याची झालर बाजूला होताच पक्ष्यांचा किलबिलाट काठावरची नीरव शांतता भंग करत आहे. या कोंडार परिसरात स्थानिक पक्ष्यांबरोबर देश-विदेशांतील पाहुण्या पक्ष्यांचे आगमन झाले आहे.

नव्या पाहुण्याची गोष्ट भारी

  • मीटरभर उंचीचा करकरा क्रोंच हा पक्षी पाकिस्तान, चीन, तिबेटसह मंगोलियामधून एव्हरेस्ट पार करून येतो.
  • राजस्थान, गुजरातमध्ये या पक्ष्यांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात पहायला मिळते.
  • करकरा क्रोंचला कांड्या करकोचा, असेही म्हणतात.
  • करड्या रंगाच्या असलेल्या पक्ष्याच्या डोक्यावर करडा पट्टा असतो. सुरेख पांढरी भुवई आणि गळ्यावर काळ्या रंगाचा मफलरप्रमाणे पट्टा असतो. कर्कश आवाज करणाऱ्या आणि थव्यांनी वास्तव्य करणाऱ्या या पक्ष्यांचा वावर कृष्णाकाठावर पहायला मिळत आहे.


हेसुद्धा पाहुणेआले भेटीला

क्रोंचबरोबरच या ठिकाणी ब्राऊन हेडेड गुल, छोटा कंठेरी चिखल्या, ठिपकेदार तुतवार, पांढरा धोबी, पिवळा धोंबी, करडा धोबी असे पाहुणे पक्षी तसेच खुल्या चोचीचा करकोचा, ब्लॅक आयबीस, कुदळ्या, ढोकरी बगळा, नदी सुरय, हळदी कुंकू बदक, राखी बगळा, टिटवी, धीवर, भिंगरी, पानकावळा, शेकोट्या आदी पाणथळीच्या पक्षांनी कृष्णाकाठावर गर्दी केली आहे. यावर्षी दीर्घकाळ पाऊस पडल्याने दलदलीच्या जागा वाढल्याने पक्षी विखुरल्याचे पहायला मिळत आहे.


गतवर्षी भुवई बदक, छोटा आर्ली हे नवीन पाहुणे पहायला मिळाले होते. पोषा, बांडी, करकरा, कार्कुंगा, कुंज अशीपोषा, बांडी, करकरा, कार्कुंगा, कुंज अशी डेमोजाईल क्रेन याची ठिक ठिकाणी प्रचलित नावे आहेत. ज्वारी व करडई हे त्यांचे आवडते खाद्य असल्याने सोलापूर जिल्ह्यात त्यांचे येणे-जाणे असते. - अभ्यासक डॉ. निनाद शहा, सोलापूर

Web Title: First sighting of the 'Karkara Cronch' bird at Amanpur on the bank of Krishna river in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली