सांगली शहरात पहिल्यांदाच होणार काँक्रिटचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 05:05 PM2020-12-14T17:05:08+5:302020-12-14T17:07:34+5:30
road safety, Pwd, Muncipal Corporation, Sangli सांगली महापालिकेच्या स्थापनेला २२ वर्षे झाल्यानंतर पहिल्यांदाच शहरात काँक्रिटचा रस्ता होणार आहे. नेहमीच खड्ड्यात रुतलेल्या राममंदिर चौक ते सिव्हिल चौक या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण होणार असून दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सांगली : महापालिकेच्या स्थापनेला २२ वर्षे झाल्यानंतर पहिल्यांदाच शहरात काँक्रिटचा रस्ता होणार आहे. नेहमीच खड्ड्यात रुतलेल्या राममंदिर चौक ते सिव्हिल चौक या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण होणार असून दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सांगली बसस्थानक, सिव्हिल रुग्णालयाकडे जाणारा हा रस्ता सर्वात वर्दळीचा आहे. काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावरील अतिक्रमणे महापालिकेने हटविली होती. या रस्त्यावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. पण महिन्याभरानंतर पुन्हा रस्ता खराब होत असे.
पावसाळ्यात तर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतात. सिव्हिल चौकात तर पाण्याचे तळे साचलेले असते. हा रस्ता दुरूस्तीची मागणी वारंवार केली जात होती. पण पॅचवर्क करूनही रस्ता कधीच सुस्थितीत नव्हता.
आयुक्त नितीन कापडणीस यांनी या रस्त्याची पाहणी करून तो आयडियल बनविण्याचा निर्धार केला. त्यानुसार रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. बांधकाम विभागाने एक कोटी ४३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले.
आता प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू झाले आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ आणि पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी भुयारी वाहिनीची व्यवस्था केली जाणार आहे. शहरात पहिल्यांदाच काँक्रिटचा रस्ता होत आहे. यापूर्वी डांबरी रस्त्यावर महापालिकेकडून खर्च होत होता.
दोन महिने रस्ता बंद
राममंदिर चौक ते सिव्हिल चौक हा रस्ता दोन महिन्यासाठी बंद करण्यात आला आहे. सध्या रस्त्यावरील ड्रेनेज व जलवाहिनी स्थलांतराचे काम सुरू आहे. ते झाल्यानंतर काँक्रिटचे काम हाती घेतले जाणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक पुष्पराज चौकमार्गे वळविण्यात आली आहे.
मिरजेतही काँक्रिटीकरण
सांगलीपाठोपाठ मिरजेतील शहर बसस्थानक ते रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्याचेही काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामाचीही निविदा काढण्यात आली आहे. लवकरच या कामालाही सुरूवात होणार असल्याचे शहर अभियंता आप्पा हलकुडे यांनी सांगितले.