देशभरात सर्वत्र फॅसिझमला पहिल्यांदा विरोध चित्रकारांचाच-- मंगेश काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:55 PM2017-09-08T23:55:38+5:302017-09-08T23:59:44+5:30
सांगली : देशात फॅसिझमचा प्रभाव वाढत चालला आहे. त्याविरोधात बुद्धिजीवी वर्गाने व्यक्त होण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : देशात फॅसिझमचा प्रभाव वाढत चालला आहे. त्याविरोधात बुद्धिजीवी वर्गाने व्यक्त होण्याची गरज आहे. फॅसिझमवाद कोणत्या पक्षाशी निगडित नसून समाजाच्या सर्व क्षेत्रांवर त्याचा परिणाम होतो. फॅसिझमला सर्वात आधी चित्रकारांनीच विरोध केला होता, असे प्रतिपादन कलाभ्यासक मंगेश काळे यांनी शुक्रवारी केले.
सांगलीतील शांतिनिकेतन कलाविश्व महाविद्यालयात आयोजित ‘विरुपीकरण, कलासंवाद, कला प्रात्यक्षिक व चित्रप्रदर्शन’ या उपक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रा. गौतमीपुत्र कांबळे, प्रा. सुरेश पंडित यांच्यासह कलामहाविद्यालयातील आजी-माजी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य बाळासाहेब पाटील यांनी स्वागत केले.
काळे म्हणाले की, मोगल काळात चित्रकलेला आश्रय मिळाला होता. पण तरीही भारत हा चित्रकलेचा देश म्हणून ओळखला जात नाही. चित्रकला ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण त्याकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आहे. आजही आपण पाश्चात्यांच्या चित्रकलेचे अनुकरण करण्यातच धन्यता मानतो. त्यासाठी देशात चित्रकलेला पोषक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. पाश्चात्य चित्रकार पिकासो आणि फ्रान्सीस बेकन यांनी विरुपीकरणाचा प्रवाह सुरु केला.
प्रचलित चित्रकलेतील अॅनाटॉमीसह दृष्यात्मकतेची सर्व बंधने झुगारून विरुपीकरण होत असते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन भारतातील तय्यब मेहता, एफ. एन. सुझा, एम. एफ. हुसेन, रझा, आरा अशा मंडळींनी विरुपीकरणातील नवे भारतीय प्रवाह प्रस्थापित केले. जोगेन चौधरी, बिकाश भट्टाचार्य, सुनील दास, भूपेन खक्कर, भारती खेर, सुरेंद्र नायर, मंजुनाथ कामत, जगन्नाथ पांड्या अशा अनेक चित्रकारांनी ही वाट अधिक प्रशस्त केली. बडोदा, बंगाल, बॉम्बे स्कूलसारख्या चळवळींमधून हा प्रवाह अधिक घट्ट झाला. माणसाच्या अंतर्मनाच्या पातळीवरील भाव-भावनांचे प्रतिबिंब बºयाचदा विरुपीकरणाच्या माध्यमातून प्रगट होते, असेही काळे म्हणाले.