सांगलीत बँकांच्या इतिहासात ३१ मार्च प्रथमच वसुलीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 12:26 AM2020-04-01T00:26:35+5:302020-04-01T00:26:57+5:30

सांगली : कोरोनामुळे बँकिंग क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच आर्थिक वर्षाचा शेवटचा म्हणजेच ३१ मार्चचा दिवस कोणत्याही मोठ्या उलाढालीशिवाय कोरडाच गेला. ...

For the first time in the history of Sangli banks without recovery | सांगलीत बँकांच्या इतिहासात ३१ मार्च प्रथमच वसुलीविना

सांगलीत बँकांच्या इतिहासात ३१ मार्च प्रथमच वसुलीविना

Next
ठळक मुद्दे कोरोनाचा फटका : लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबले, कर्जाची थकबाकी मोठी

सांगली : कोरोनामुळे बँकिंग क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच आर्थिक वर्षाचा शेवटचा म्हणजेच ३१ मार्चचा दिवस कोणत्याही मोठ्या उलाढालीशिवाय कोरडाच गेला. मोठ्या थकबाकींच्या वसुलीसह नफ्याची नोंद करून ताळेबंद सक्षम करण्याचा हा दिवस यंदा अनेक आर्थिक अडचणींची नोंद करून गेला.

बँकिंग व्यवसायात ३१ मार्च हा दिवस सर्वात महत्त्वाचा असतो. आर्थिक वर्ष संपताना ताळेबंद निश्चितीसाठी हा दिवस अखेरचा असल्याने या दिवशी जास्तीत जास्त कर्जवसुली करून नफ्याच्या माध्यमातून वित्तीय सक्षमता नोंदविण्यासाठी बँकांची धडपड सुरू असते. कृषी कर्जासह, वाहन, गृह, व्यावसायिक, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्राला कर्जपुरवठा केल्यानंतर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये याची जास्तीत जास्त वसुली करण्याकडे बँकांचा कल असतो. अगदी ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीही कोट्यवधी रुपयांची वसुली बँकांकडे होत असते. यंदा बँकिंग क्षेत्राची ही परंपरा खंडित झाली आहे. अनेक अडचणी, थकीत कर्ज, एनपीएची वाढलेली टक्केवारी, कमी होत असलेला नफा अशा नोंदी करून आर्थिक सक्षमतेला हादरा देणाऱ्या गोष्टी बँकिंग क्षेत्राला नाईलाजास्तव पाहाव्या आणि कराव्या लागत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. सांगली जिल्ह्यातही सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रासाठी केलेला कर्जपुरवठा अडचणीत आला आहे. संबंधित क्षेत्रात उलाढालच नसल्याने कर्जवसुली करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी बँका, पतसंस्था व अन्य वित्तीय संस्थांनी मंगळवारी ३१ मार्च रोजी अशा अनेक नकोशा गोष्टींच्या नोंदी ताळेबंदात करून आर्थिक वर्षाचा समारोप केला. बँकांचा हा ताळेबंद यंदा या क्षेत्राला हादरा देणारा आहे. पुढील आर्थिक वर्षात अनेक आव्हाने निर्माण करणारा आणि कामाचा भार वाढविणारा ठरणार आहे.


लिलाव प्रक्रियेलाही अडचणी
जप्त केलेल्या संस्थांच्या मालमत्तांचा लिलावही मार्चपूर्वीच केला जातो. सेक्युरिटायझेशनअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १५ हून अधिक बँकांनी गेल्या तीन महिन्यांपासून थकबाकीदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. मार्चमध्ये अशा अनेक थकबाकीदार संस्थांचे लिलाव होणार होते. पण संचारबंदीमुळे ही प्रक्रिया प्रतिसादाविना पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे तितक्या प्रमाणावर थकबाकीची नोंद बँकांच्या ताळेबंदाला होणार आहे.


या गोष्टींनी घटणार नफा
कृषी व अन्य क्षेत्रांच्या कर्जाची थकबाकी वाढली
संचारबंदीमुळे कर्जवसुलीस अडचणी
लिलाव प्रक्रियेला संचारबंदीमुळे अडचणी आल्याने वसुली थांबली
कर्जवसुलीसाठी प्रत्यक्ष बॅँकांना कर्जदाराच्या दारापर्यंत जाता आले नाही
गृह, वाहन कर्जाचे हप्ते तीन महिने लांबणीवर टाकले
नव्या कर्जाचे वाटप होऊ शकले नाही

Web Title: For the first time in the history of Sangli banks without recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली