चांदोलीच्या पायथ्याला मत्स्यबीज प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:27 AM2020-12-29T04:27:17+5:302020-12-29T04:27:17+5:30
शिराळा : तालुक्याचे वैभव असणाऱ्या चांदोली धरणाच्या पायथ्याला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या मत्स्यबीज प्रकल्पाचे काम ...
शिराळा : तालुक्याचे वैभव असणाऱ्या चांदोली धरणाच्या पायथ्याला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या मत्स्यबीज प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. चांदोली धरण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या प्रमुख पर्यटनस्थळांबरोबरच हा प्रकल्प पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
शासनाच्या तांत्रिक व्यवसाय मत्सबीज यांनी प्रस्तावित केलेल्या व जिल्हा वार्षिक नियोजन योजनेंतर्गत सुचविण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या उभारणीनंतर चांदोलीच्या पर्यटनाला गती मिळणार आहे शिवाय स्थानिकांना रोजगार मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या प्रकल्पात ८०० चौरस मीटरची तेरा तळी बांधण्यात आली आहेत. प्रत्येक तळ्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सूर्यकिरणांमुळे बीज नष्ट होऊ नये म्हणून कलर कोटेड शेड उभारण्यात येणार आहे. उपकरणे व इतर साहित्यांसाठी स्वतंत्र इमारत उभी केली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत मत्स्यबिजांची पैदास, पालनपोषण, मोठ्या माशांची निर्मिती करून त्यांची देखभाल करणे, मत्स्य पिलांची साठवण करणे, असे नियोजन आहे. धरणाच्या पायथ्याला हा प्रकल्प उभारण्यात येत असल्यामुळे धरणातील पाण्याचा वापर करून बिजापासून मोठ्या माशांचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे. नदीतील पाणी तळ्यांमध्ये साठविण्यासाठी फिल्टर चेंबर बांधण्यात येणार आहेत. तळ्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी तसेच सांडपाणी व्यवस्था, मोरी बांधकाम करण्यात येणार आहे. जवळच असणाऱ्या वारणा कालव्यातील पाणी सायफन पद्धतीने तलावात सोडण्यात येणार आहे.
पॉईंटर
नदीतील येणारे पाणी तळ्यांमध्ये साठविण्यासाठी फिल्टर चेंबर
तळ्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी तसेच सांडपाणी व्यवस्था मोरी बांधकाम
प्रत्येक तळ्यांमध्ये उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था
फोटो : चांदोली (ता. शिराळा) येथील धरणाच्या पायथ्याला मत्सबीज प्रकल्पाची उभारणी गतीने सुरू आहे.