मत्स्यव्यवसाय विभागाच्या भरतीस स्थगिती देणार, जानकर यांनी दिले आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:51 PM2019-01-21T12:51:22+5:302019-01-21T12:55:33+5:30
मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळल्याने पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन तातडीने भरतीची प्रक्रिया बंद करुन नव्याने मरीन बायॉलॉजी पात्रतेचा समावेश करुन जाहिरात प्रसिध्द करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असे आश्वासन मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी तरुणांना दिले.
सांगली : मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळल्याने पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन तातडीने भरतीची प्रक्रिया बंद करुन नव्याने मरीन बायॉलॉजी पात्रतेचा समावेश करुन जाहिरात प्रसिध्द करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असे आश्वासन मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी तरुणांना दिले.
लोकमतने दि. १६ जानेवारी २०१९ रोजी मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळली या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील तरुणांनी प्रा. डॉ. एन. डी. बिरनाळे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री जानकर यांची कऱ्हाड येथे भेट घेतली. यावेळी जानकर यांनी शिष्टमंडळाला भरतीतील बदल करण्याचे आश्वासन दिले.
मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या ९० जागा भरणार असल्याचे जाहीर करुन तशी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यानंतर क वर्गातील सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पद भरतीच्या ७९ जागा जाहीर केल्या आहेत. उर्वरित अ व ब वर्गाच्या ११ जागांची भरती जाहीर केली नाही. सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पदासाठी बी.एफ्.एस्सी. ही पदवी पात्र ठरविली आहे.
वास्तविक महाराष्ट्रात मत्स्यव्यवसाय विभागात १९८९-९० पासून एम्.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) पात्रताधारक उमेदवारांची भरती झाली आहे. आजही असे अधिकारी मत्स्यव्यवसाय विभागात सेवेत आहेत. असे असताना केवळ बी.एफ.एस्सी. ही पात्रता ठरविल्याने मत्स्यविभागात गुणवत्तेच्या बाबतीत सरस ठरणाऱ्या एम्.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) उमेदवारांवर शासनाने अन्याय केला असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप आहे.
मत्स्यव्यवसाय विभागात ब व क वर्गातील ७९ जागा जाहीर केल्या आहेत. ज्या ७९ जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी व उर्वरित ११ जागांसाठीही एम.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) ही शैक्षणिक पात्रता ग्राह्य धरून सुधारित ९० जागांची फेरजाहिरात द्यावी व अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मरीन बायॉलॉजी पात्रतेच्या उमेदवारांनी मंत्री जानकर यांच्याकडे केली.
यावेळी जानकर यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मत्स्यव्यवसाय विभागाच्या भरतीमधील जाहिरातीमध्ये त्रुटी असल्याचे तरुणांच्या तक्रारी आहेत. या तक्रारीची सत्यता पडताळून भरतीला स्थगिती देवून सुधारीत जाहिरात काढण्याची सूचनाही अधिकाऱ्यांना दिली आहे, अशी माहिती प्रा. डॉ. एन. डी. बिरनाळे यांनी दिली.