शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धन पथदर्शी प्रकल्पामुळे मत्स्य पालनास चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 02:14 PM2019-12-18T14:14:10+5:302019-12-18T14:15:56+5:30
सांगली जिल्हा नियोजन विकास समिती सन 2019-20 योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण बाबीमधून शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धन करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शासकिय किंवा वैयक्तिक खर्चातून तयार करण्यात आलेल्या शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धन करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या तळ्यांमध्ये सुविधेच्या माध्यमातून उत्पादन वाढीस चालना मिळणार आहे.
सांगली : जिल्हा नियोजन विकास समिती सन 2019-20 योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण बाबीमधून शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धन करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शासकिय किंवा वैयक्तिक खर्चातून तयार करण्यात आलेल्या शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धन करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या तळ्यांमध्ये सुविधेच्या माध्यमातून उत्पादन वाढीस चालना मिळणार आहे.
साधारणत: १०० ७ १०० फूट शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धन केल्यास जवळपास एक ते दीड लाख रूपये उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे या शासनाच्या धोरणाशी ही योजना सुसंगत असून हा पथदर्शी प्रकल्प राबविल्यामुळे शेततळ्यातील मत्स्य पालनास चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मिरज तालुक्यातील बेडग व एरंडोली येथील मत्स्यसंवर्धन केलेल्या शेततळ्यांची प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, तालुका कृषि अधिकारी प्रदीप कदम, आत्माचे जिल्हा समन्वयक मुकुंद जाधवर, तासगाव तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विवेक कुमार पाटील, अविनाश एकंडे, तानाजी नलवडे, रविंद्र शेळके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यात ज्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात शेततळे, शेततळ्यांना अस्तरीकरण केलेले आहे अशा निवडक गावामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शेततळ्यामध्ये मत्स्यपालन हा नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी ९५ लाख रूपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यामध्ये ५४ लाख रूपये शासन हिस्सा आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीमुळे आत्मा अंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे मत्स्यसंवर्धनाच्या पूरक उद्योगातून उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. ही योजना आत्मा अंतर्गत शेतीगटांमार्फत राबवण्यात येत असून योजनेचा संपूर्ण लाभ हा गटाला देणे अपेक्षित असून हा निधी गटाच्या खात्यावर देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात आत्माअंतर्गत सन 2018-19 मध्ये शेततळ्यामध्ये मत्स्यपालन शेतीशाळा प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली होती त्यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये माशांची वाढ चांगली झाली असून ९ ते ११ महिन्यामध्ये दीड ते दोन किलो वजनाचे मासे तयार झालेले आहेत.
या अनुभवाचा वापर करून जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यातील प्रत्येकी एक ते दोन गावाची निवड करून प्रत्येक गावात किमान १०० शेततळ्यांमध्ये मत्स्यपालनास चालना देवून अतिरिक्त उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी मिरज व तासगाव तालुक्यातील गावे निवडून २०० शेततळ्यांकरीता शेततळ्यातील मत्स्यपालन नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत चालू वर्षात ९५ लाख रूपयांची मान्यता देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी
डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, ही योजना आत्मा अंतर्गत शेतीगटामार्फत राबविण्यात येत असून प्रति गट २० शेतकरी याप्रमाणे मिरज तालुक्यात ८ गट तर तासगाव तालुक्यात २ गट स्थापन केले आहेत. असे एकूण २०० शेतकरी सहभागी झाले आहेत. मत्स्यपालनाबाबत गट प्रमुखांना सिंधुदूर्ग व पुणे येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच आत्मा कार्यालयाच्या वतीने प्रत्येक टप्प्यावर शेतीशाळा घेवून या शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
बेडग येथील रामचंद्र खाडे, रामचंद्र गडदे, राजाराम खरात व एरंडोली येथील शिवशांत दळवी यांच्या मत्स्यसंवर्धन केलेल्या शेततळ्यांची पाहणी करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धनासाठी मत्स्यबीज, जाळी, मत्स्यखाद्य यासाठी ५० टक्के अनुदान मिळत असल्यामुळे तसेच मत्स्यपालनातून चांगले उत्पन्न मिळण्याबरोबरच मत्स्यसंवर्धन केलेल्या शेततळ्यातील पाणी पिकांना दिल्यामुळे त्याचा फायदा होणार असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले.