विषारी पावडर टाकून कृष्णा नदीत मासेमारी- : भिलवडी परिसरातील प्रकाराने चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:26 PM2019-06-06T23:26:07+5:302019-06-06T23:26:42+5:30
कृष्णाकाठच्या पलूस तालुक्यातील भिलवडी व परिसरात कृष्णा नदीमध्ये अज्ञात तस्करांच्या टोळीकडून विषारी पावडर टाकून मासेमारी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शरद जाधव ।
भिलवडी : कृष्णाकाठच्या पलूस तालुक्यातील भिलवडी व परिसरात कृष्णा नदीमध्ये अज्ञात तस्करांच्या टोळीकडून विषारी पावडर टाकून मासेमारी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्याविरोधात वन विभाग व पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी भिलवडी व परिसरातील भोई समाजाकडून करण्यात येत आहे.
भिलवडी, महावीरनगर, धनगाव, औदुंबर, आमणापूर, नागठाणे, चोपडेवाडी आदी गावालगत असणाऱ्या कृष्णा नदीपात्रात या उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात अशापद्धतीने मासेमारी केली जाते. ही सर्व मंडळी परगावहून येऊन हे कृत्य करून पसार होत आहेत. ज्या ठिकाणी पाण्याचा मोठा डोह आहे, नदीकाठी गवत किंवा झाडे आहेत, अशा ठिकाणी माशांचा मोठा वावर असतो. अज्ञात मच्छिमार सायंकाळच्या वेळेस पाण्यामध्ये विषारी पावडर टाकतात.
यानंतर तासाभराच्या कालावधीनंतर त्या परिसरातील मासे मृत होऊन पाण्यावर येऊन तरंगतात. संबंधित मच्छिमार पाण्यावर तरंगणारे मोठाले मासे गोळा करून घेऊन गायब होतात. हे मासे घरी खाण्यासाठी किंवा थेट व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी पाठविले जातात. छडीने, फेक जाळीने किंवा काहिलीने जाळी सोडून पारंपरिक पद्धतीने मासे पकडले जातात. मात्र आता अनैसर्गिक पद्धतीने मासेमारी होते. यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.
पाण्यातील मासे मरत असल्याने ते पाणी पिण्यासाठीही धोकादायक बनत आहे. मे व जून महिन्यात माशांचा प्रजननकाळ असतो. या औषधांमुळे मोठ्या माशांसोबत लहान मासेही मृत होतात. अशाप्रकारे माशांची मोठी तस्करी करणारी टोळी छुप्या पध्दतीने कामकाज चालविते. याचा फटका कृष्णा नदीकाठच्या मच्छिमारांना बसत आहे.भिलवडी, माळवाडी, आमणापूर, वाळवा आदी परिसरातील साडेपाचशेवर भोई समाजातील कुटुंबांचा उदरनिर्वाह पारंपरिक पद्धतीने होणाºया मासेमारीवरच चालतो. विषारी औषधे वापरून होणाºया मासेमारीमुळे नदीपात्रातील माशांची संख्या अचानक कमी होत आहे. मच्छिमारांच्या व्यवसायावर संक्रांत येत आहे.
मासे तस्करांवर : कारवाई करावी
पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाºया भोई समाजाचा रोजगार हिरावून घेणाºया अज्ञात टोळीचा शोध घेऊन वन विभाग व पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा भिलवडी गावचे माजी उपसरपंच व सांगली जिल्हा भोई समाजाचे अध्यक्ष तानाजी भोई यांनी दिला आहे.