सांगलीत साडेपाच लाख वाहनांना बसवावी लागणार नवी नंबरप्लेट, किती वाहनांची झाली ऑनलाइन नोंदणी.. वाचा
By संतोष भिसे | Updated: March 4, 2025 15:08 IST2025-03-04T15:07:56+5:302025-03-04T15:08:58+5:30
सांगली : वाहनांच्या नंबरप्लेटमधील छेडछाड आणि बनवेगिरीचे गुन्हे कमी करण्यासाठी सर्व वाहनांना एचएसआरपी नंंबरप्लेट बसविणे सक्तीचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ...

संग्रहित छाया
सांगली : वाहनांच्या नंबरप्लेटमधील छेडछाड आणि बनवेगिरीचे गुन्हे कमी करण्यासाठी सर्व वाहनांना एचएसआरपी नंंबरप्लेट बसविणे सक्तीचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १० हजार ४२१ वाहनधारकांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. त्यापैकी १ हजार ७२१ वाहनधारकांच्या वाहनांना नवीन नंबरप्लेट बसविल्या आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी ही माहिती पत्रकार बैठकीत दिली.
गाजरे म्हणाले, १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक आहे. यासाठी शासनाच्या संकेतस्थळावरुन नोंदणी करता येते. यासाठी वाहनमालकांनी कोणालाही अतिरिक्त शुल्क देऊ नये. नंबरप्लेट बसविण्यासाठी जिल्ह्यातील सात ठिकाणी स्वतंत्र केंद्रे सुरु केली आहेत. अंकली, मिरज, सांगली, विटा, इस्लामपूर येथे ही केंद्रे कार्यान्वित आहेत.
ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुटसुटीत आहे. अर्ज भरल्यावर वाहनप्रणालीशी वाहनाची माहिती संलग्न केली जाते. यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे सुलभ होणार आहे. जिल्ह्यात सध्या रस्त्यावर १४ लाख १२ हजार वाहने धावत आहेत. त्यापैकी १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांची संख्या ५ लाख ५९ हजार २९७ आहे. १५ वर्षांपेक्षा जुने वाहन असलेल्या व पुनर्नोंदणी केलेल्या वाहनांनाही एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे आवश्यक आहे. आतापर्यंत २ टक्के वाहनधारकांनी नव्या नंबरप्लेटसाठी नोंदणी केली आहे. नंबरप्लेट बसविण्यासाठी ३० एप्रिलपर्यत मुदतवाढ दिली आहे.
वाहनमालकांची गैरसोय
एचएसआरपी नंबरप्लेटसाठी जिल्ह्यात सात केंद्रांची सुविधा केली आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यावर अपॉइंटमेंट मिळते. दिवस आणि वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य वाहनमालकाला आहे. पण अनेक केंद्रांवर रणरणत्या उन्हात वाहनचालक प्रतीक्षेत थांबल्याचे चित्र दिसत आहे. दिलेली वेळही केंद्रचालक पाळत नसल्याची तक्रार आहे.
दृष्टीक्षेपात आढावा
- जिल्ह्यातील एकूण वाहनसंख्या : १४ लाख १२०००
- १ एप्रिल २०१९ पूर्वीची वाहनसंख्या : ५ लाख ५९ हजार २९७
- आतापर्यंत ऑनलाइन नोंदणी : १०४२१
- आतापर्यंत नवी नंबरप्लेट बसविलेली वाहने : १७२१
- नवी नंबरप्लेट बसविण्यासाठी मुदत ३० एप्रिल २०२५