भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन सभापती

By admin | Published: March 15, 2017 12:27 AM2017-03-15T00:27:53+5:302017-03-15T00:27:53+5:30

पंचायत समिती सभापती निवड : खानापुरात शिवसेनेचा झेंडा; शिराळ्यात दोन्ही काँग्रेसची सत्ता; मिरजेत भाजपला अपक्षाचे बळ

Five BJP candidates, three NCP candidates | भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन सभापती

भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन सभापती

Next


सांगली : जिल्ह्यातील दहा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडी मंगळवारी पार पडल्या. आटपाडी, पलूस, कडेगाव, जत आणि मिरज या पाच पंचायत समितीत भाजपचे कमळ फुलले आहे. वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळ या तीन पंचायत समित्या ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आले असून, शिराळ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता कायम राहिली आहे. खानापूर पंचायत समितीत प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला.
सभापती आणि उपसभापतींच्या निवडी संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात पार पडल्या. मिरज आणि जत पंचायत समितीत सत्तेसाठी भाजपकडे काठावरचे बहुमत होते. त्यामुळे निवडीपूर्वी राजकीय हालचाली गतिमान झाल्या होत्या. आटपाडी, पलूस, कडेगाव, जत आणि मिरज या पाच पंचायत समितींमध्ये सत्ता स्थापन्याची भाजपची खेळी यशस्वी झाली. मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत नाट्यमय घडामोडी घडल्या. मिरजेत भाजप ११, काँग्रेस सात, राष्ट्रवादी दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटना एक, अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. सभापती पदासाठी भाजपकडून जनाबाई पाटील, तर काँग्रेसच्या पूनम कोळी यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पाटील १२, तर कोळी यांना १० मते मिळाली. भाजपला अपक्ष सदस्याने बळ दिल्याने सभापतीपदी जनाबाई पाटील यांची वर्णी लागली. उपसभापतीसाठी काकासाहेब धामणे (भाजप), अशोक मोहिते (राष्ट्रवादी), तर काँग्रेसकडून रंगराव जाधव यांचा अर्ज भरण्यात आला. काँग्रेस-राष्ट्रवादीत एकमत न झाल्याने काँग्रेसने सातही मते भाजपच्या पारड्यात टाकली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला साथ दिली. त्यामुळे उपसभापती धामणे यांना २०, तर मोहिते यांना दोन मते मिळाली. काँग्रेसचे जाधव यांनी स्वत:चे मतही भाजपला दिल्याचे स्पष्ट झाले.
जत पंचायत समितीमध्ये भाजपकडे काठावरचे बहुमत होते. अठरापैकी नऊ जागा त्यांना मिळाल्या आहेत. काँग्रेसला ७, वसंतदादा विकास आघाडी आणि जनसुराज्य पक्षाला प्रत्येकी एक जागा आहे. भाजपने काँग्रेसच्या नाराज गटाचे नेते सुरेश शिंदे यांच्याशी समझोता करून वसंतदादा विकास आघाडीचा पाठिंबा मिळविला. त्यामुळे भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला. सभापतीसाठी मंगल जमदाडे, तर उपसभापतीसाठी आघाडीचे शिवाजी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.
खानापूर पंचायत समितीत शिवसेनेकडे पाच, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे एक जागा आहे. सभापतीपदी मनीषा बागल, तर उपसभापतीपदी बाळासाहेब नलवडे यांची बिनविरोध निवड झाली. वाळवा पंचायत समितीत राष्ट्रवादी बारा, रयत विकास आघाडी ७, तर काँग्रेसचे तीन सदस्य आहेत. सभापतीसाठी राष्ट्रवादीकडून येडेमच्छिंद्र गणातील सचिन हुलवान व रयत आघाडीतून वंदना गावडे यांचा, तर उपसभापतीसाठी वाळवा गणातील नेताजी पाटील (राष्ट्रवादी) व बावची गणाचे आशिष काळे (रयत आघाडी) यांचे अर्ज दाखल झाले होते. रयत आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने गावडे आणि काळे यांनी अर्ज मागे घेतला. सभापतीपदी हुलवान आणि उपसभापती म्हणून पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
तासगाव पंचायत समितीत मतदान घेऊन सभापती आणि उपसभापतीची निवड झाली. राष्ट्रवादी सात, तर भाजपकडे पाच सदस्य आहेत. राष्ट्रवादीकडून माया एडके व बेबीताई माळी यांचा अर्ज दाखल झाले होते. माळी यांच्याकडे जात प्रमाणपत्र नसल्याने छाननीत अर्ज बाद झाला. उपसभापतीपदासाठी संभाजी पाटील (राष्ट्रवादी) आणि सुनील जाधव (भाजप) यांनी अर्ज दाखल केला. सभापती आणि उपसभापतीची निवड हात उंचावून मतदानाने घेण्यात आली. सभापती एडके व उपसभापतीपदी पाटील यांनी सात मते घेऊन बाजी मारली. आ. सुमनताई पाटील यांना तासगावचा गड कायम ठेवण्यात यश आले.
कवठेमहांकाळ पंचायत समितीत राष्ट्रवादी आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे वर्चस्व आहे. सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे मनोहर पाटील आणि उपसभापती पदासाठी स्वाभिमानी विकास आघाडीच्या सरिता शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.
शिराळा पंचायत समितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी आहे. आठपैकी सात जागा त्यांच्याकडे आहेत. अनुसूचित जाती महिलांसाठी सभापतीपद आरक्षित असल्यामुळे मांगले गणातील मायावती रामचंद्र कांबळे यांची सभापतीपदी वर्णी लागली. उपसभापतीपदी सम्राटसिंह नाईक आणि बाळासाहेब नायकवडी यांची नावे चर्चेत होती, मात्र नाईक यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना संधी देण्यात आली.

Web Title: Five BJP candidates, three NCP candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.