सांगली महापालिकेतून पाच बोटी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 11:30 AM2021-01-02T11:30:31+5:302021-01-02T11:35:16+5:30
Muncipal Corporation Sangli- : २००५-०६ मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुरानंतर शासनाने महापालिकेला सहा बोटी दिल्या होत्या. पण त्यापैकी पाच बोटी गायब झाल्या आहेत, तर एका बोटीची अवस्था जळणात घालण्यासारखी झाली आहे.
सांगली : २००५-०६ मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुरानंतर शासनाने महापालिकेला सहा बोटी दिल्या होत्या. पण त्यापैकी पाच बोटी गायब झाल्या आहेत, तर एका बोटीची अवस्था जळणात घालण्यासारखी झाली आहे.
या पाच बोटी नेमक्या कुठे गायब झाल्या, त्या चोरीला गेल्या, की आपत्ती व्यवस्थापनाकडील कर्मचाऱ्यांना परस्परच विकल्या, याचा शोध घेण्याची मागणी नगरसेवक गजानन मगदूम यांनी शुक्रवारी स्थायी समिती सभेत केली. सभापती पांडुरंग कोरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
मगदूम म्हणाले की, कृष्णा नदीला पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. महापालिकेकडे यांत्रिकी बोटी नव्हत्या. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत अनेक गोष्टींचा अभाव होता. त्यामुळे शासनाने महापालिकेला सहा बोटी दिल्या.
या बोटी अग्निशमन विभागाकडे होत्या. २००५-०६ नंतर शहरात महापूर आला नाही. २०१९ मध्ये पुन्हा महापुराने शहरात थैमान घातले. तेव्हाही बोटींची कमरतता दिसून आली.
याचदरम्यान प्रशासनाने नव्याने बोटी खरेदीचा विषय स्थायी समितीसमोर पाठविला होता. पण गत महापुरातील सहा बोटींची माहिती घेता, पाच बोटी गायब असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बोटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमत करून विकल्या आहेत.
याबाबत अग्निशमन विभागाकडे माहितीही विचारली. पण अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे स्थायी समिती सभेत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. सभापती कोरे यांनी तसे आदेश प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.
संगनमत करून बोटी विकल्या
मगदूम म्हणाले की, अग्निशमन विभागाकडील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून या बोटी विकल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. अधिकारी, कर्मचारीच महापालिकेच्या मालमत्तेवर डल्ला मारत आहेत. येत्या आठ दिवसात या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर फौजदारी दाखल न झाल्यास स्थायी सभा उधळून लावू, असा इशाराही दिला.