वैभव, रोहित पाटील, सुहास बाबर पहिल्याच चेंडूवर षटकारासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 06:26 PM2024-10-29T18:26:26+5:302024-10-29T18:29:16+5:30
घनशाम नवाथे सांगली : क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणे सहज शक्य नसते. त्यासाठी ‘सेट’ व्हावे लागते. परंतु राजकारणात तसे ...
घनशाम नवाथे
सांगली : क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणे सहज शक्य नसते. त्यासाठी ‘सेट’ व्हावे लागते. परंतु राजकारणात तसे काही नसते. पहिल्याच प्रयत्नात विजयी षटकार ठोकण्याची संधी चालून येऊ शकते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युवा नेते रोहित पाटील, सुहास बाबर, वैभव पाटील, संग्रामसिंह देशमुख, जयश्री पाटील यांची पहिली लढत उत्कंठावर्धक आणि चर्चेची ठरू शकते. पहिल्याच प्रयत्नात ते षटकार ठोकणार? की झुंज देणार? हे प्रचाराची रणनीती, पाठीराख्यांची ताकद, लढतीपूर्वीचा सराव आदींवर अवलंबून असणार आहे.
पूर्वीचा तासगाव मतदारसंघ आणि आत्ताचा तासगाव-कवठेमहांकाळ येथील लढतीकडे अनेकांचे लक्ष असते. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यानंतर सुमनताई पाटील यांनी हा गड राखला. आता नवे शिलेदार म्हणून रोहित पाटील मैदानात उतरले आहेत. त्यांची पहिली लढत तीदेखील विधानसभेची आहे. त्यांच्या वडिलांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी, माजी खा. संजय पाटील यांच्याशी त्यांचा सामना असेल. राज्याचे युवा नेते म्हणून ते सर्वत्र चर्चेत आहेत. त्यामुळे त्यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष असणार आहे.
खानापूर मतदारसंघात दिवंगत नेते आ. अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना शिंदेसेनेकडून अपेक्षेप्रमाणे उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात महाआघाडीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून वैभव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दोघेही विधानसभेच्या मैदानात प्रथमच लढत आहेत. दोन्ही कुटुंबांची पारंपरिक लढाई यापूर्वी लक्षवेधी ठरली आहे. आता दोन्ही कुटुंबांचे वारस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पहिल्याच प्रयत्नात विजयाचा षटकार ठोकण्यासाठी ते सज्ज आहेत. अर्थात त्यांची लढाई सोपी नसून त्यांना फार सराव करावा लागणार आहे.
पलूस-कडेगाव मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मागील निवडणुकीत त्यांना तिकीट मिळाले नाही. यंदा कोणत्याही परिस्थितीत लढायचे असा निर्धार करून ते सज्ज आहेत. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आ. डॉ. विश्वजीत कदम मैदानात उतरले आहेत.
सांगलीत विधानसभेच्या मैदानात जयश्री पाटील या प्रथमच उतरल्या आहेत. तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यांच्यामागे मदनभाऊंचे समर्थक आहेत. प्रमुख लढतीमध्ये असलेल्या रोहित पाटील, सुहास बाबर, वैभव पाटील, संग्रामसिंह देशमुख, जयश्री पाटील हे प्रथमच विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. यापूर्वी पहिल्याच प्रयत्नात विधानसभेला विजयाचा षटकार अनेकांनी ठोकला आहे. त्यांच्या यादीत आणखी कोणाचा समावेश होणार? याची उत्सुकता अनेकांना असणार आहे.
काही पुन्हा नशीब आजमावणार
विधानसभेच्या मैदानात सलग दुसऱ्यांदा, हॅटट्रिक किंवा त्यापेक्षा जास्तवेळा निवडून येण्यासाठी काही उमेदवार रिंगणात आहेत. काहींचा पराभव झाल्यानंतर ते पुन्हा मैदानात उतरले आहेत. पराभवाचा वचपा काढण्याची काहींना प्रतीक्षा असणार आहे. त्याचबरोबर पाडापाडीच्या राजकारणासाठीही काहीजण सज्ज आहेत. त्यामुळे कोणाचे नशीब साथ देणार? याचीही उत्सुकता लागली आहे.