‘मनपा’तील पाच वादग्रस्त ठराव रद्द
By admin | Published: June 19, 2015 11:53 PM2015-06-19T23:53:26+5:302015-06-20T00:35:34+5:30
या दोन्ही गटात समेट घडवून वादावर पडदा टाकण्यात आला. पेल्यातील वादळ शमले तरी ऐनवेळच्या ठरावावरून पक्षांतर्गत धुसफूस कायम होती.
सांगली : महापालिकेच्या एप्रिल महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेतील ऐनवेळचे पाच वादग्रस्त ठराव अखेर रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी सत्ताधारी काँग्रेसच्या पक्ष बैठकीत घेण्यात आला. या ठरावावरून महापौर व गटनेत्यांत संघर्ष निर्माण झाला होता. विशेष म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांच्या सूचनेवरून केलेले ठरावही आता रद्द होणार आहेत. काँग्रेस पक्ष बैठकीच्या अध्यक्षस्थानी गटनेते किशोर जामदार होते. या बैठकीला महापौर विवेक कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. महापालिकेच्या १९ एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळचे ठराव घुसडण्यात आले होते. या ठरावावरून सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांविरोधात बंड पुकारले. त्याला विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची साथ मिळाली होती. सभेत सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रित येत महापौरांची कोंडी केली होती. सभेनंतर महापौर विरुद्ध गटनेते असा संघर्ष पालिकेत पेटला होता. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. सत्ताधारी गटातील बेबनाव वाढत गेल्याने अखेर काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कानउघाडणी केली होती. त्यानंतर या दोन्ही गटात समेट घडवून वादावर पडदा टाकण्यात आला.
पेल्यातील वादळ शमले तरी ऐनवेळच्या ठरावावरून पक्षांतर्गत धुसफूस कायम होती. विरोधी राष्ट्रवादीने सर्वच ठराव रद्द करण्याचा आग्रह धरला, तर काँग्रेसने काही ठराव रद्द करून काहींना मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. अखेर शुक्रवारी पक्ष बैठकीत महापौरांच्या वादग्रस्त ठरावाला ‘रेड सिग्नल’ दाखविण्यात आला.
त्यानुसार ग्रीन पार्कला दिलेली भाड्डेपट्ट्यावरील जागा, मजलेकर पेट्रोलपंपाच्या जागेचा ताबा, वि. स. खांडेकर वाचनालय इमारतीवरील टेरेसवर करण्यात आलेल्या बांधकामास मंजुरी, तेरावा वित्त आयोग व एलबीटीच्या वसुुलीसाठी महापौरांना प्राधिकृत करणे आदी ठराव रद्द केले जाणार आहेत, अशी माहिती महापौर कांबळे यांनी पत्रकारांना दिली.
माधवनगर ते मिरजेतील कृपामयीपर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असताना त्याची नुकसानभरपाई महापालिकेने देण्याचा विषय अजेंड्यावर आहे.
या रस्त्याची मालकी शोधण्याचे आदेशही शुक्रवारच्या बैठकीत प्रशासनाला देण्यात आले.
हा रस्ता दीडशे फुटाचा करणे, यामध्ये सातजणांच्या मिळकतीचा समावेश करणे, यासाठी नुकसानभरपाई कोणी द्यायची, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे की महापालिकेचा, याची माहिती घेऊन अहवाल देण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. (प्रतिनिधी)
नेत्यांची सूचना रद्दबातल
महापौर विवेक कांबळे यांच्या ऐनवेळी केलेले काही ठराव त्यांच्या नेत्यांच्या सूचनेवरून झाले होते. एका नगरसेवकाने जागा भाडेपट्टीचा ठराव आणला होता. याची उघड चर्चा महापौर गटात सुरू होती, पण आता हे दोन्ही ठराव रद्द केले जाणार आहेत. विरोधकांना खूश ठेवण्यासाठीही एक ठराव घुसडण्यात आला होता. तोही रद्द होणार आहे. ठराव रद्द करण्याचे शहाणपण सत्ताधाऱ्यांना उशिरा सुचले, असेच म्हणावे लागेल.
आजची सभा गाजण्याची शक्यता
महापौर कांबळे यांच्या कार्यकालात झालेल्या ऐनवेळच्या ठरावावरून काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित हल्लाबोल केला होता. त्यातून महापौर व गटनेत्यांत संघर्ष निर्माण झाला. आता त्यांच्यातील वादावर पडदा पडल्यानंतर ऐनवेळचे काही ठराव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीने मात्र सर्वच ठराव रद्द करावेत, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आजची सभा गाजण्याची शक्यता आहे. येथील महापालिकेच्या मुख्यालयात शनिवारी सकाळी अकरा वाजता ही सभा होत आहे.