मिरजेत दत्त चौकात दोन भाजी विक्रेत्यांसह पाचजण कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:33 AM2021-04-30T04:33:18+5:302021-04-30T04:33:18+5:30
मिरज : मिरजेत मैदान दत्त मंदिर चौक परिसरात बुधवारी पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासनाने विनाकारण रस्त्यावर फिरणारे ...
मिरज : मिरजेत मैदान दत्त मंदिर चौक परिसरात बुधवारी पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासनाने विनाकारण रस्त्यावर फिरणारे नागरिक व रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या भाजी विक्रेत्यांची कोरोना चाचणी केली. ६५ जणांच्या चाचणीत पाचजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या पाच जणांपैकी दोन भाजी विक्रेते असल्याने खरेदीसाठी गर्दी करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते.
मिरजेतील लोणी बाजार व मैदान दत्त मंदिर परिसरात संचारबंदीच्या काळातही भाजी विक्रेते, हातगाडे चालक सकाळी ठाण मांडतात. विनाकारण फिरणाऱ्यांचीही येथे वर्दळ आहे. बुधवारी सकाळी शहर पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार व सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी दत्त चाैकात रस्त्यावरील भाजी विक्रेते, नागरिक, महिलांना रांगेत उभे करुन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून सर्वांची रॅपिड अँटिजेन चाचणी केली. यावेळी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या अनेकांनी गयावया करून व खोटी कारणे सांगून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कठोर पवित्रा घेतल्याने एकूण ६५ जणांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. तपासणीत पाचजण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यापैकी दोघे भाजी विक्रेते आहेत. सर्व पाच जणांची महापालिका कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली.
विनाकारण फिरणारे व भाजी खरेदीसाठी येणाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करुन स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करावा असे पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी सांगितले. रस्त्यावर भरणारा भाजी बाजार हॉटस्पॉट ठरु नये. यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी केले.