सांगलीत कृष्णा नदीच्या पूरसंरक्षक भिंतीसाठी पाच कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:19 AM2021-07-10T04:19:13+5:302021-07-10T04:19:13+5:30
सांगली : शहरातील कृष्णा नदीवरील रामेश्वर मंदिर (सरकारी घाट) ते विष्णू घाटापर्यंत सुशोभीकरण व पूरसंरक्षक भिंत बांधण्याच्या कामास ...
सांगली : शहरातील कृष्णा नदीवरील रामेश्वर मंदिर (सरकारी घाट) ते विष्णू घाटापर्यंत सुशोभीकरण व पूरसंरक्षक भिंत बांधण्याच्या कामास शासनाने शुक्रवारी मंजुरी दिली. या कामासाठी पाच कोटींचा निधी खर्च होणार आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून या कामासाठी निधी मंजूर झाल्याचे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी सांगितले.
सांगली शहराला तीनवेळा महापुराचा फटका बसला. पुरामुळे नदीकाठची शेती, घरे व सार्वजनिक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले होते. पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी नदीपात्राची गेल्यावर्षी पाहणी केली होती. यावेळी नदीकाठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले होते. त्यानुसार सरकारी घाट ते विष्णू घाटपर्यंतच्या घाट सुशोभीकरण व पूरसंरक्षक भिंतीचा आराखडा शासनाला सादर केला होता. त्याला गुरुवारी जलसंपदा विभागाने तांत्रिक मान्यता दिली. या कामासाठी ४ कोटी ९७ लाख ८६ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापूर्वी जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने वसंतदादा पाटील स्मारक ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंत पूरसंरक्षक भिंत व घाट बांधण्यात आला आहे.
या कामासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे नेते शेखर माने यांनीही जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.