शामरावनगरच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:25 AM2021-03-26T04:25:05+5:302021-03-26T04:25:05+5:30
फोटो ओळी : सांगलीतील शामरावनगरच्या विकासासाठी निधी मिळावा, अशी मागणी नगरसेविका नसीमा नाईक यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. ...
फोटो ओळी : सांगलीतील शामरावनगरच्या विकासासाठी निधी मिळावा, अशी मागणी नगरसेविका नसीमा नाईक यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. यावेळी सभापती स्नेहल सावंत, महेंद्र सावंत, अपर्णा कदम, आनंदा देवमाने, रज्जाक नाईक उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शामरावनगर परिसरातील रस्ते, गटारी, विद्युत व्यवस्थेची कामे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. या परिसराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीतून पाच कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी नगरसेविका नसीमा नाईक यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.
यावेळी समाजकल्याण सभापती स्नेहल सावंत, नगरसेवक महेंद्र सावंत, अपर्णा कदम, माजी उपमहापौर विजय घाडगे, आनंदा देवमाने, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक उपस्थित होते. नाईक म्हणाल्या की, शामरावनगर, इंदिरानगर, रामनगर, काळीवाट परिसर, कोल्हापूर रोड, विठ्ठलनगर, हनुमाननगर हा परिसर विस्तारित व गुंठेवारी भाग असून, या परिसरात रस्ते, गटारी, लाईट व्यवस्था ही कामे अनेक वर्षे प्रलंबित आहेत. महापालिकेकडून विकासकामांना मिळणारा निधी हा फार कमी प्रमाणात असतो. त्यामुळे मोठी कामे करणे शक्य होत नाही. शामरावनगर परिसराच्या विकासासाठी नियोजन समितीमधून पाच कोटींचा विशेष निधी मिळावा तसेच शहरात मुस्लिम व ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न गंभीर बनला आहे. दफनभूमीसाठी कोल्हापूर रोड परिसरात जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. पालकमंत्र्यांनी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिल्याचे त्यांनी सांगितले.