Sangli- तिरुपतीजवळ अपघातात अथणीतील पाच भाविक ठार, देवदर्शनाहून परतताना घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 11:50 AM2023-09-16T11:50:24+5:302023-09-16T11:51:30+5:30
मोटारीची ट्रकशी समोरासमोर धडक, ११ जण जखमी
अथणी : तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या माेटारीची ट्रकशी समाेरासमाेर धडक हाेऊन झालेल्या भीषण अपघातात बडची (ता. अथणी, जि. बेळगाव) येथील एकाच कुटुंबातील चाैघांसह पाच जण जागीच ठार, तर ११ जण जखमी झाले. शुक्रवार, दि. १५ राेजी पहाटे आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यात कडप्पा चित्तूर राष्ट्रीय महामार्गावर कवीपल्ली मंडल गावाजवळ हा अपघात घडला.
हनुमंता आजुर (वय ५२), महानंदा आजुर (वय ४६), शोभा आजुर (वय ३६), अंबिका आजुर (वय १९, चौघेही रा. बडची) व चालक हणमंत जाधव (वय ५२) अशी मृतांची नावे आहेत. जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
अथणी तालुक्यातील बडची येथील आजुर कुटुंबीय दरवर्षी तिरुपतीस बालाजी दर्शनासाठी जातात. दरवर्षीप्रमाणे चार दिवसांपूर्वी हणमंत जाधव यांच्या माेटारीतून आजुर कुटुंबातील १५ जण तिरुपतीस गेले हाेते. गुरुवारी रात्री ते देवदर्शन करून गावी परण्यासाठी निघाले. शुक्रवारी पहाटे आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यात कडप्पा चित्तूर राष्ट्रीय महामार्गावर कवीपल्ली मंडल गावाजवळ समाेरून येत असलेल्या ट्रकने त्यांच्या माेटारीस जाेरदार धडक दिली. अपघातात माेटारीचा अक्षरश: चक्काचूर झाला. ट्रकला धडकून माेटार रस्त्याकडेच्या झुडुपात घुसली.
अपघातात माेटारीतील पाच जण जागीच ठार झाले तर अन्य ११ जण जखमी झाले. जखमींना तिरुपती रोवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच बडची येथील आजुर यांच्या नातेवाइकांनी अपघातस्थळी धाव घेतली.