कौल लावणारे पाच देवॠषी गजाआड

By admin | Published: March 13, 2017 10:51 PM2017-03-13T22:51:21+5:302017-03-13T22:51:21+5:30

सुरुरच्या दावजी पाटील मंदिरात ‘अंनिस’ची कारवाई : आई-वडिलांची मानसिक त्रासातून सुटका करण्यासाठी बारा हजारांची मागणी

Five Devshi GajaAd, which has been installed, | कौल लावणारे पाच देवॠषी गजाआड

कौल लावणारे पाच देवॠषी गजाआड

Next



कवठे : आई-वडिलांची मानसिक त्रासापासून सुटका करण्यासाठी देवाकडे कौल लावतो असे सांगून पैशांची मागणी केल्याची तक्रार आल्यानंतर पाच देवऋषींना भुर्इंज पोलिसांनी सुरुर येथून रविवारी अटक केली. यावेळी त्यांच्याकडून अनेक आक्षेपार्ह वस्तूही जप्त करण्यात आल्या. रमेश बागल, अशोक बागल, भरत बागल, धनेश बागल, शंकर बागल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, सुरुर येथील सुप्रसिद्ध दावजी पाटील मंदिरात भानामती अन् करणीच्या नावाखाली बुवाबाजीचा बाजारच भरत असल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आली होती. त्याठिकाणी दर अमावस्या व पौर्णिमेला दरबार भरत होता. त्याठिकाणी येणाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी अंधश्रद्धा पसरवत देवाकडे कौल लावतो, असे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात होती, असेही तक्रारीत म्हटले होते.
त्यानुसार ‘अंनिस’तर्फे एक बनावट भक्त पाठविण्यात आला. त्याच्या आई-वडिलांची मानसिक त्रासातून मुक्तता व्हावी, अशी विनंती त्याने केल्यानंतर संबंधित पुजाऱ्यांनी पैशाची मागणी केली. तसेच आजार दूर करण्यासाठी देवास कौल लावतो, असेही सांगितले. याप्रकरणी भुर्इंज पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सुरुवातीला तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर आणखी दोघे सापडले. त्यांच्याकडून काळ्या बाहुल्या, रोख रक्कम, लिंबू आदी वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी ‘अंनिस’चे राज्य सचिव प्रशांत पोतदार, बुवाबाजी संघर्ष सचिव भगवान रणदिवे, आरीफ मुल्ला, धर्मराज माने, सुनील रणदिवे आदी कार्यकर्त्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पद्माकर घनवट, त्यांचे सहकारी व भुर्इंज पोलिसांनी ही कारवाई केली.
या कारवाईत रमेश बागल, अशोक बागल, भरत बागल, धनेश बागल, शंकर बागल यांना महाराष्ट्र नगरबळी व इतर अमानुष अनिष्ठ आणि अघोरी कृत्य याला प्रतिबंध व निर्मूलन कायदा २०१३ च्या परिच्छेद ३ व ५ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. (वार्ताहर)
पौर्णिमेलाच निघाला मुहूर्त
सुरुरच्या मंदिरात तीन ते चार अमावस्या, पौर्णिमेला भेट देऊन आल्यानंतर ‘अंनिस’तर्फे तेथील प्रकाराची पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पौर्णिमेची निवड करण्यात आली. त्यानुसार रविवार, दि. १२ रोजी ही कारवाई करून अटक केली.
पुणे-मुंबईहून
गाड्यांचा ताफा
या ठिकाणी येणाऱ्यांमध्ये पुणे, मुंबईच्या झोपडपट्टीतील रहिवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे गाड्या लावण्यासाठीही जागा मिळत नाही.
समस्या सोडविणारे दुकान
‘संबंधित मंदिरात माणसे समस्या सोडविण्यासाठी बसलेली होती. त्यांच्या समोरच्या टेबलवर कौल लावण्यासाठी गहू ठेवलेले होते. अंनिस व पोलिसांनी छापा टाकल्याचे समजल्यावर त्यांना हालचाल करण्यासाठीही संधी मिळाली नाही. त्यामुळे सर्व साहित्यांनिशी त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी बिबे, काळ्या बाहुल्या, लिंबं तसेच सत्तर ते पंचाहत्तर रुपयांची रोकडही सापडली,’ अशी माहिती प्रशांत पोतदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Five Devshi GajaAd, which has been installed,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.