पाच ग्रामसेवकांवर फौजदारी
By admin | Published: January 4, 2017 10:31 PM2017-01-04T22:31:57+5:302017-01-04T22:31:57+5:30
जिल्हा परिषद स्थायी समिती सभा : चौतीसजणांची वेतनवाढ रोखली
सांगली : जिल्ह्यातील पंचवीस ते तीस ग्रामपंचायतींमध्ये लाखो रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी पाच ग्रामसेवकांवर फौजदारी करण्यात आली. तसेच उर्वरित ३४ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत बुधवारी घेण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील यांच्या अध्यक्षेतखाली स्थायी समितीची सभा झाली. यावेळी ग्रामसेवकांच्या अपहाराचा मुद्दा सदस्य रणधीर नाईक यांनी उपस्थित केला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी, ए. एन. कांबळे (मासाळवाडी, ता. आटपाडी), एल. जी. खांडेकर (काराजनगी, ता. जत), बी. बी. साठे (फुपिरे, ता. शिराळा), पी. एन. कोळी (राडेवाडी, ता. पलूस), ए. एस. मुलाणी (शेखरवाडी, ता. वाळवा) या ग्रामसेवकांवर फौजदारी कारवाई केली आहे, तसेच आणखी चार ग्रामसेवकांवर कायदेशीर सल्ला घेऊन दोन दिवसात फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, याशिवाय ३४ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी रणधीर नाईक यांनी, फौजदारी कारवाईबरोबरच संबंधित ग्रामसेवकांकडून अपहाराची रक्कम वसूल झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यादृष्टीनेही प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत, अशीही त्यांनी मागणी केली. त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी, संबंधित ग्रामसेवकांकडून अपहाराची रक्कम वसुलीच्यादृष्टीनेच फौजदारी कारवाई केली आहे, काही ग्रामपंचायतींमधील अपहाराची रक्कम संबंधित ग्रामसेवकांकडून वसूल केली आहे. तरीही अपहारास जबाबदार धरून त्यांच्यावर वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे, असेही सांगितले.
जिल्ह्यातील उर्वरित ग्रामपंचायतींचेही लेखापरीक्षण करण्याची मागणी सदस्यांनी स्थायी समितीत केली. (प्रतिनिधी)
योजनांचे पैसे : आता लाभार्थींच्या खात्यावर
जिल्हा परिषद स्वीय निधीतून कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, समाजकल्याण विभागाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. साहित्य खरेदीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी योजनांचा निधी थेट लाभार्थींच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला. त्यानुसार लेडीज सायकलसाठी प्रति लाभार्थी ३७०० रूपये, झेरॉक्स यंत्रासाठी ३० हजार, शिलाई यंत्रासाठी सहा हजार, चापकटर ११ हजार ५०० आणि स्पे्रपंपासाठी २७०० रूपये देण्याचा निर्णयही झाला. येत्या दोन दिवसात ही रक्कम लाभार्थींच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती स्नेहल पाटील यांनी सांगितली.