सांगली: खवरेवाडी शिवारात पाच गव्यांचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 10:53 PM2022-01-31T22:53:21+5:302022-01-31T22:54:11+5:30
रस्त्याच्या खालच्या शिवारातून हे गवे रस्ता ओलांडून वारणा डावा कालव्याच्या दिशेने शेतात गेले.
पुनवत : खवरेवाडी (ता. शिराळा) येथील शिवारात सोमवारी रात्री आठच्या सुमारास लहानमोठ्या पाच गव्यांचे दर्शन नागरिकांना झाले. रस्त्याच्या खालच्या शिवारातून हे गवे रस्ता ओलांडून वारणा डावा कालव्याच्या दिशेने शेतात गेले.
खवरेवाडीतील भोळ्याचा माळ शिवारात ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब गायकवाड, यशवंत खोत, जालिंदर पाटील, अरुण खोत, संदीप माने, लालासाहेब खवरे, आदी शेतकरी गेले असता हे गवे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात गवे येण्याची ही पहिलीच घटना आहे.
दरम्यान, हे गवे वारणा नदी पार करून शाहूवाडी तालुक्यातून आल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. बिबट्याबरोबरच आता भागात गवे आल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. शिराळा तालुक्यातील अनेक भागात गवे, बिबट्यांचा वावर असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.