रेल्वेमार्गावरील ढिगारा कोसळून पाच जखमी
By admin | Published: January 24, 2016 12:20 AM2016-01-24T00:20:04+5:302016-01-24T00:20:04+5:30
अंकलीतील घटना : भुयारी मार्गाचे काम सुरू असताना अपघात; जखमींमध्ये रेल्वे अधिकारी, कर्मचारी
मिरज : मिरज-जयसिंगपूरदरम्यान रेल्वेमार्गावर अंकली येथे रेल्वेफाटकाखालून भुयारी मार्ग तयार करण्याचे काम सुरू असताना, शनिवारी मातीचा ढिगारा पडून रेल्वे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदारासह पाचजण जखमी झाले. जखमींना मातीच्या ढिगाऱ्यातून काढून मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यास तीन तास विलंब झाला.
मिरज विभागाचे रेल पथनिरीक्षक सायमन पुट्टाप्पा, सहायक रेल्वे अभियंता समीर सातारकर, मुकादम हणमंता यल्लाप्पा, ठेकेदार व्यंकटेश हणमंता भंडारी (सर्व रा. मिरज) आणि एक मजुराचा जखमीत समावेश आहे.
मिरज ते कोल्हापूरदरम्यान मानवरहित रेल्वे फाटक बंद करून वाहतुकीसाठी भुयारी मार्ग तयार करण्यासाठी गेले तीन आठवडे मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. अंकली येथे गेट क्रमांक चारजवळ शनिवारी मध्यरात्री भुयारी मार्ग तयार करण्याचे काम सुरू होते. जेसीबीने रेल्वे मार्गाखालील माती खोदून मोठ्या आकाराचे सिमेंट ब्लॉक बसविण्यात येत होते. जेसीबीने काढलेल्या मातीचे ढीग रेल्वे मार्गाशेजारी होते.
मध्यरात्री चार वाजता सिमेंट ब्लॉक रेल्वेमार्गाखाली ओढण्यात येत असताना ढिगाऱ्यावरील कामगारांच्या धक्क्याने मातीचा ढिगारा कोसळला. ढिगाऱ्याजवळ रेल्वे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार व मजूर असे अकराजण थांबले होते. ढिगारा अंगावर पडल्याने पाचजण ढिगाऱ्याखाली अडकले. जेसीबीने माती बाजूला काढून अडकलेल्या पाचजणांना बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर मिरजेत खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
भुयारी मार्गाचे काम सुरू असताना रेल्वे अधिकारी कर्मचारी अपघातात जखमी झाल्याच्या घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली होती. मिरजेतील रेल्वे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अपघाताच्या घटनेमुळे रेल्वे वाहतूक सुरू होण्यास तब्बल तीन तास विलंब झाला. सकाळी सहाऐवजी नऊ वाजता मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू झाली. (वार्ताहर)
दुरुस्तीस विलंब : प्रवाशांचे झाले हाल
शनिवारी मध्यरात्री एक ते सकाळी सहापर्यंत मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र अपघातामुळे सकाळी नऊ वाजता रेल्वे वाहतूक सुरू झाली. कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस पहाटे साडेचार, महालक्ष्मी एक्स्प्रेस मिरजेत थांबविण्यात आल्या होत्या. कोल्हापुरातून येणारी कोयना एक्स्प्रेस जयसिंगपूर येथे थांबविण्यात आली होती. भुयारी मार्गाचे काम वेळेत पूर्ण झाले नसल्याने सकाळी नऊनंतर मिरज-कोल्हापूर वाहतूक सुरळीत झाली. रेल्वेमार्ग सुरू होण्यास विलंब झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
मिरज-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद
शनिवारी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत मेगाब्लॉकमुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक बंद होती. मेगाब्लॉक व अपघातामुळे सकाळी सह्याद्री एक्स्प्रेस व महालक्ष्मी एक्स्प्रेस तीन तास विलंबाने कोल्हापूरला रवाना झाली. सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस मिरजेत थांबविण्यात आली होती. कोल्हापुरातून सुटणारी पुणे पॅसेंजर व हैदराबाद एक्स्प्रेस मिरजेतून सोडण्यात आली.