महामार्गावर दोन अपघांतात पाच ठार; चौघेजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2016 01:21 AM2016-06-02T01:21:21+5:302016-06-02T01:21:21+5:30
मृत सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील : नेर्लेजवळ कंटेनरच्या धडकेने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू; येडेनिपाणीजवळ मोटार उड्डाणपुलावरून कोसळून गांधीनगरचे सासरा-सून ठार
कासेगाव/कामेरी : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत पाचजण ठार झाले, तर चारजण गंभीर जखमी झाले.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नेर्ले (ता. वाळवा) गावाजवळ कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील तिघे ठार झाले. हा अपघात मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास घडला. विठ्ठल कुमार मंडले (वय ३०), अमर ऊर्फ बापू शामराव कांबळे (२७, दोघे रा. रेठरे कारखाना, ता. कऱ्हाड, जि. सातारा) व भगीरथ महादेव कुंभार (२३, रा. खुबी, ता. कऱ्हाड) अशी मृतांची नावे आहेत.
विठ्ठल मंडले, अमर कांबळे व भगीरथ कुंभार हे मित्र असून, काही कामानिमित्त मंगळवारी इस्लामपूरला आले होते. तेथील काम आटोपून पुन्हा कऱ्हाडकडे निघाले होते. ते ज्या दुचाकीवरून प्रवास करीत होते, ती नवीन असून, अद्याप पासिंगही झालेले नाही. त्यामुळे दुचाकीला क्रमांक नव्हता. त्यांची दुचाकी नेर्ले येथील हॉटेल दत्त भुवनजवळ आली असताना कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या कंटेनरने (आरजे १४ जीजी ७०७९) पाठीमागील बाजूने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकी कंटेनरच्या चाकात अडकली गेली.
यामध्ये डोक्याला गंभीर मार लागल्याने मंडले व कांबळे जागीच ठार झाले, तर कुंभार गंभीर जखमी झाला होता. अपघाताचे वृत्त समजताच हॉटेल दत्त भुवनमधील सर्व घटनास्थळी धावले. त्यांनी तत्काळ जखमीला कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले; परंतु तेथे उपचार सुरू असताना कुंभार याचाही मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालक वाहन तेथेच सोडून पसार झाला.
अर्जुन लक्ष्मण सूर्यवंशी (रा. काळमवाडी) यांनी कासेगाव पोलिसांत या घटनेची वर्दी दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
दुसरा अपघात बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील येडेनिपाणी-इटकरे फाट्याजवळ उड्डाणपुलावरून २५ ते ३० फूट खाली मोटार कोसळून झाला. यात सासरा-सून जागीच ठार, तर चौघे गंभीर जखमी झाले. रामचंद्र गुरुनोमल वधवा (वय ६५), भावना मनोज वधवा (३५, सर्व रा. गांधीनगर, कोल्हापूर) यांचा मृतांमध्ये समावेश आहे, तर मनोज रामचंद्र वधवा (३५), मोहित मनोज वधवा (९), महेक मनोज वधवा (१३), अश्विनी वधवा (१५, सर्व रा. गांधीनगर, कोल्हापूर) गंभीर (पान १ वरून) जखमी आहेत.
गांधीनगर येथील वधवा कुटुंबीय बुधवारी (दि. १ जून) पहाटे मोटारीतून (एमएच 0८ आर ५६७८) उरळीकांचन येथे देवदर्शनासाठी निघाले होते. मनोज वधवा स्वत: गाडी चालवीत होते. त्यांच्यासोबत वडील रामचंद्र वधवा, पत्नी भावना वधवा, मुले महेक आणि मोहित व भाची अश्विनी हेही देवदर्शनासाठी निघाले होते.
वधवा यांची मोटार इटकरे-येडेनिपाणी फाट्यानजीकच्या उड्डाणपुलाजवळ आली असता त्यांच्या गाडीच्या आडवे कुत्रे गेले. त्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मनोज वधवा यांचा मोटारीवरील ताबा सुटला. यामुळे मोटार उड्डाणपुलावरून २५ ते ३0 फूट खाली असलेल्या सेवारस्त्यावर कोसळली. यामध्ये रामचंद्र वधवा, भावना वधवा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. इतर चौघे गंभीर जखमी झाले. यामध्ये मोटारीचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी जखमींना तत्काळ बाहेर काढून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची नोंद कुरळप पोलिस ठाण्यात झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक पल्लवी चव्हाण अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर) (पान ९ वर)
कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात
वधवा यांची मोटार इटकरे-येडेनिपाणी फाट्यानजीकच्या उड्डाणपुलाजवळ आली असता त्यांच्या गाडीच्या आडवे कुत्रे गेले. त्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मनोज वधवा यांचा मोटारीवरील ताबा सुटला. यामुळे मोटार उड्डाणपुलावरून २५ ते ३0 फूट खाली असलेल्या सेवारस्त्यावर कोसळली. यामध्ये रामचंद्र वधवा, भावना वधवा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. इतर चौघे गंभीर जखमी झाले. यामध्ये मोटारीचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.