अडीच एकरात ‘देशी केळी’तून पाच लाखाचे उत्पन्न
By admin | Published: September 2, 2016 11:37 PM2016-09-02T23:37:33+5:302016-09-03T01:06:55+5:30
पद्माळेच्या धडपड्या शेतकऱ्याचा प्रयोग; महिन्याला तब्बल दहा टन उत्पादनाचे उद्दिष्ट
सांगलीजवळच्या कृष्णा नदीकाठच्या गावांत मुबलक पाण्यामुळे शेतकरी ऊसपीक घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याला पर्याय म्हणून विनोद बाबूराव चौगुले (रा. पद्माळे, ता. मिरज) या तरूण शेतकऱ्याने देशी केळीचे पीक घेण्याचा वेगळा प्रयोग केला आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी सुनियोजित प्रयत्न तो करत आहे. बाजारात ग्राहकांना महिन्याला दहा टन देशी केळी उपलब्ध करून देण्याचे ध्येय त्याने ठेवले आहे.
पद्माळे या कृष्णाकाठावर असणाऱ्या गावात ऊस पिकाचे क्षेत्र मोठे आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी नदीच्या कडेला मळीभागात केळीच्या बागा काही प्रमाणात होत्या, पण नंतर त्यांचे रूपांतर ऊस पट्ट्यात झाले. विनोद चौगुले यांची दहा एकर शेती आहे. यापूर्वी त्यांनी हळद, मूग, उडीद ही पिके घेतली होती. कमीत कमी कालावधित उत्तम पिके घेण्याबरोबरच त्यांनी जमिनीचा पोत सुधारत विक्रमी उत्पन्न घेतले आहे.
वेगळे प्रयोग करण्याकडे कल असणाऱ्या विनोद यांनी ऊस पिकाला फाटा देत शेतात देशी केळी घेण्याचे ठरवले, त्यासाठी अभ्यासही सुरू केला. आधुनिक पध्दतीने त्याची लागवड सुरू केली. पहिल्या टप्प्यात अडीच एकर क्षेत्र यासाठी निवडले. लागवडीयोग्य जमीन, पाट पाणी पध्दत करीत निपाणी येथून देशी केळीची राजापुरी जातीची टिश्यु कल्चर रोपे (प्रतिरोप वीस रुपये) आणली. सहा फूट बाय सहा अंतरावर एकूण ३२०० रोपांची लागण २९ जून ते १ जुलै २०१५ दरम्यान केली. यासाठी मौजे डिग्रजचे दीपक फराटे यांनी मार्गदर्शन केले. मात्र गत उन्हाळ्यात दोनशे रोपे खराब झाली. त्या ठिकाणी पुन्हा नवीन लागवड झाली. सेंद्रीय खताबरोबरच रासायनिक खते, कीटकनाशकांचा योग्य वापर, औषध फवारणी यामुळे पीक निरोगी आले. महिन्याला गोमूत्र डोस व अतिरिक्त केळी पिकाची (पिले) छाटणी, यामुळे १ जानेवारीपासून केळीचे घड पडणे सुरू झाले. सरासरी नऊ किलोचा घड ठेवण्यात आला. लागवडीनंतर चौदा महिन्यांनी दुसरे घड पडण्यास सुरूवात झाली.
कोल्हापूर येथील व्यापाऱ्यांनी बागेची पाहणी करून टनाला सरासरी पंचवीस हजार दर निश्चित केला. विशेष म्हणजे, त्यावेळी बाजारात प्रत्यक्ष दर कमी होता, तरीही मालाचा दर्जा पाहून अधिक दर दिला. आता दुसऱ्यांकडून ३० ते ३५ हजार दर देण्याची बोली होत असूनही, त्याच व्यापाऱ्यास चौगुले माल देत आहेत. त्यांना २४ ते २५ टन पीक अपेक्षित होते, पण एकरी सरासरी नऊ टन केळी मिळतील असे वाटते. काळी माती व पाट पाणी पध्दत त्यामुळे काही प्रमाणात नुकसान होते. आजअखेर त्यांना तीन लाख रू पये खर्च आला आहे, तर उत्पन्न पाच लाखाचे मिळाले आहे. शेतात ते स्वत: राबतात.
१ जुलै २०१६ ला त्यांनी आणखी दोन एकर शेतीत देशी केळीबाग केली असून त्यासाठी रोपे शेतातीलच वापरली आहेत. १ नोव्हेंबर २०१६ ला आणखी केळीबाग करण्याचा त्यांचा इरादा आहे. तीन टप्प्यात बाग असल्याने भविष्यात आठवड्यास दोन टन देशी केळी बाजारात पाठवता येतील, असे त्यांना वाटते. नदीकाठच्या परिसरात अतिरिक्त पाण्यामुळे शेती काही प्रमाणात खराब होत आहे. त्यातच काळी माती असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. केळी पिकासाठी ही स्थिती अडचणीची होती.
- गजानन साळुंखे