पाच बळी गेलेल्या रस्त्यावरून पाच लाख लोकही गेलेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 05:28 AM2018-07-15T05:28:09+5:302018-07-15T05:28:25+5:30
मुंबई परिसरात खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेल्याच्या घटनेविषयी मला माहिती नाही.
सांगली : मुंबई परिसरात खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेल्याच्या घटनेविषयी मला माहिती नाही. पण ज्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हे बळी गेले, त्याच रस्त्यावरून पाच लाख लोकही गेले असतील. त्यापैकी पाच जणांचा बळी गेला. यात रस्त्याचा दोष असेल, तर त्यांच्या कुटुंबीयांना निश्चित मदत करता येईल, असे सांगत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी राज्य शासनाची जबाबदारी टाळली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. या खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे. याबाबत सांगली दौऱ्यावर आलेल्या मंत्री पाटील यांना विचारता त्यांनी, खराब रस्ते व खड्ड्यांची जबाबदारी महापालिकेवर टाकली.
>ज्यांचे राज्य, त्यांनीच चिंता करावी
मुंबईत दरवर्षी मुसळधार पाऊस होतो. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते खराब होणारच. पण रस्ते खराब झाल्यावर ते बुजविणे महत्त्वाचे आहे. मुंबईतील बहुतांश रस्ते महापालिकेचे आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी महापालिकेचीच आहे. ज्यांचे राज्य आहे, त्यांनीच त्याची चिंता करावी. पावसातही कोल्ड डांबराचा वापर करून खड्डे मुजविता येतात. गतवर्षी सायन ते पनवेल या रस्त्यावरील खड्डे आम्ही मुजविले होते, असेही पाटील म्हणाले.