सांगलीत गटारीत पाच महिन्यांचे बालक सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:29 AM2021-04-28T04:29:04+5:302021-04-28T04:29:04+5:30
सांगली : येथील चांदणी चौकातील आप्पा कासार झोपडपट्टीजवळील गटारीत एक पाच महिन्यांचे पुरुष जातीचे बालक मंगळवारी सकाळी सापडले. ...
सांगली : येथील चांदणी चौकातील आप्पा कासार झोपडपट्टीजवळील गटारीत एक पाच महिन्यांचे पुरुष जातीचे बालक मंगळवारी सकाळी सापडले. या घटनेने झोपडपट्टी परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बालकास बाहेर काढून शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. दरम्यान, या घटनेची नोंद विश्रामबाग पोलिसांत झाली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. महादेव शिवाक्का मांग (वय ६१) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की महादेव हे कुटुंबासमवेत चांदणी चौक परिसरातील आप्पा कासार झोपडपट्टीत राहतात. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास ते घरासमोरील गटारीजवळ गेले होते. त्यावेळी त्यांना गटारीत एक बालक दिसून आले. त्यांनी तातडीने महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना याबाबतची माहिती दिली. महापौर सूर्यवंशी यांच्यासह आयुक्त नितीन कापडणीस यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ बालक बाहेर काढून शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी केली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस अधिक तपास करत आहेत.