जिल्ह्यात आणखी पाच ऑक्सिजन केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:27 AM2021-05-06T04:27:22+5:302021-05-06T04:27:22+5:30
सांगली : जिल्ह्यात मिरज, आटपाडी, पलूस, कवठेमहांकाळ येथे पाच ऑक्सिजन निर्मिती केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. विटा, कडेगाव, माडग्याळ व ...
सांगली : जिल्ह्यात मिरज, आटपाडी, पलूस, कवठेमहांकाळ येथे पाच ऑक्सिजन निर्मिती केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. विटा, कडेगाव, माडग्याळ व जत येथे नव्याने प्रस्ताव पाठवले आहेत. याशिवाय नॅशनल हायवे प्राधिकरणाकडून जिल्ह्यात एक ऑक्सिजन निर्मिती केंद्र मंजूर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी प्रतिदिन सुमारे ४० टन ऑक्सिजनची गरज आहे. गेले पंधरा दिवस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या जेमतेम ऑक्सिजन मिळतोय. तीन आठवड्यापूर्वी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात मिरज (दोन), आटपाडी ( एक), पलूस ( एक) व कवठेमहांकाळ ( एक) या पाच केंद्रांचे पाठवलेले प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यानंतर विटा, कडेगाव, जत व माडग्याळ येथे नव्याने ऑक्सिजन निर्मिती केंद्रांसाठी प्रस्ताव पाठवले आहेत. नॅशनल हायवे प्राधिकरणाकडून जिल्ह्यात दोन ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती केंद्र मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यातील एक केंद्र मिरज येथे घेण्यात येणार आहे. मिरजेतील केंद्र सांगलीतील शासकीय रुग्णालयात आणणार आहे. दुसरे केंद्र जत येथे देण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.