मेणीजवळ दरोडेखोरांची पाचजणांना मारहाण
By admin | Published: November 2, 2016 12:30 AM2016-11-02T00:30:13+5:302016-11-02T00:30:13+5:30
एक जखमी : पाच तोळे दागिन्यांसह रोकड लुटली
येळापूर/कोकरूड : मेणीपैकी आटुगडेवाडी (ता. शिराळा) येथील यादव वस्तीवर दरोडेखोरांनी एकाच कुटुंबातील पाचजणांना मारहाण करत पाच तोळे सोन्याचे दागिने, दहा हजारांची रोकड असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. यामध्ये बाळू विठ्ठल यादव (वय ४७) जखमी झाले असून, त्यांच्यावर शेडगेवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेची नोंद कोकरूड पोलिसांत करण्यात आली आहे.
मेणीपैकी आटुगडेवाडी ही वाडी कऱ्हाड-शेडगेवाडी मार्गावर असून, या वाडीतील विठ्ठल यादव गेल्या चाळीस वर्षांपासून वस्तीवर वडील विठ्ठल यादव, आई वैजयंता यादव (वय ६०), चुलती जनाबाई महादेव यादव (७५), पत्नी सुमन (४२) आणि बहीण मालूताई बाळकृष्ण बांदल (४०) यांच्यासोबत राहतात. याच ठिकाणी त्यांची सर्व जमीन असून, त्यांचा वाडीशी अत्यंत कमी संपर्क आहे. यादव वस्ती व वाडीमधील अंतर एक किलोमीटर आहे. या वस्तीवरील यादव कुटुंबीय लक्ष्मीपूजनानंतर झोपी गेले असता, मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांचे कुत्रे जोराने भुंकू लागले. तो आवाज ऐकून बाळू यादव यांचे वडील विठ्ठल यादव बाहेर आले. त्यावेळी दबा धरून बसलेले सहा ते सात दरोडेखोर पुढे आले. विठ्ठल यादव यांचे तोंड दाबून सर्वजण घरात शिरले.
दरोडेखोरांनी घरातील चार महिलांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची बोरमाळ, अर्धा तोळ्याची तीन मंगळसूत्रं, दोन तोळ्यांचे गंठण, तसेच वैजयंता यादव यांच्या बटव्यातील दहा हजार अशी रक्कम हिसकावून घेतली. चौघींना मारहाणही केली. बाळू यादव यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला केला. त्यांच्या उजव्या हातावर व पाठीवर वार करण्यात आले. बाळू यादव यांचे वडील आजारी असून, घरातील महिलांना विरोध करता आला नाही. सर्व ऐवज घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. ते सर्व परिसरातील बोली भाषेतच बोलत होते.
बाळू यादव यांनी कोकरूड पोलिसांना तातडीने कळविले. या प्रकाराने कुटुंबातील महिला भयभीत झाल्या आहेत. जखमी यादव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. (वार्ताहर)