सांगलीत पाच पिस्तूल, दहा काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:31 PM2018-05-20T23:31:23+5:302018-05-20T23:31:23+5:30
सांगली : शहरात पिस्तूल व काडतुसांची विक्री करण्यास आलेल्या सातारा व पुणे जिल्ह्यातील दोघांना गुंडाविरोधी पथकाने रविवारी दुपारी पकडले. शंभरफुटी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई करण्यात आली. दोघांकडून पाच पिस्तूल, दहा जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व दुचाकी असा साडेतीन लाखांचा माल जप्त केला आहे.
सौरभ विजय कुलकर्णी (वय २१, रा. गुरसाळे, ता. खटाव, जि. सातारा) व सौरभ सुनील जाधव (२२, बस स्थानकाजवळ, भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे, सध्या गुरसाळे, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा व अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी बेकायदा हत्यार बाळगणारे व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक संजय डोके रविवारी शंभरफुटी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी डोके यांना दोन तरुण काळ्या रंगाच्या दुचाकीवरून चेतना पेट्रोल पंपाजवळ पिस्तूल व काडतुसाची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली.
पथकाने पंपाजवळ सापळा लावला. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुण काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आले. त्यांना थांबवून चौकशी केली असता, एकाच्या पाठीवर सॅक होती. सॅकची झडती घेतल्यानंतर त्यात पाच पिस्तूल व दहा जिवंत काडतुसे सापडल्याने ती जप्त करण्यात आली. दोघांची कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांनी हा शस्त्रसाठा विक्री करण्यास आलो होतो, अशी कबुली दिली आहे. त्यांच्याविरुद्ध बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी विश्राबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना सोमवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. सहाय्यक पोलीस फौजदार लक्ष्मण मोरे, महेश आवळे, शंकर पाटील, सागर लवटे, संदीप गुरव, आर्यन देशिंगकर, सुप्रिया साळुंखे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
पहिल्यांदाच रेकॉर्डवर
शर्मा म्हणाले, संशयित पहिल्यांदाच रेकॉर्डवर आले आहेत. यातील सौरभ कुलकर्णी हॉटेल व्यावसायिक आहे. त्याचा साथीदार इंदापूर तालुक्यातील असला तरी तो नोकरीनिमित्त गुरसाळेत राहतो. त्यामुळे या दोघांची ओळख आहे. एवढी पिस्तुले व काडतुसे त्यांच्याजवळ आढळून आल्याने ते कोणाला तरी विकणार होते, हे स्पष्ट होते. ज्याला या शस्त्रांची गरज होती, त्याच्यापासून कोणाच्या जिवाला धोका असू शकतो, या सर्व बाबी तपासातून उजेडात आणल्या जातील.
मुळापर्यंत तपास : शर्मा
जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईची माहिती दिली. गुंड भावश्या पाटीलला पकडण्याची कामगिरी करणाऱ्या गुंडाविरोधी पथकाचे शर्मा यांनी पुन्हा एकदा कौतुक केले. ते म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिस्तूल व काडतुसे पकडण्याची झालेली कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. संशयितांची कसून चौकशी केली जाईल. त्यांनी पिस्तूल कोठून आणले? सांगलीत कोणाला विकणार होते? त्यांच्याकडे सापडलेली दुचाकी कोणाची? याच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल.