संभाजी भिडेंच्या संरक्षणातील पाच पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:50 PM2018-04-27T23:50:08+5:302018-04-28T07:54:28+5:30
सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या संरक्षणातील पाच पोलिसांना शुुक्रवारी रात्री तडकाफडकी निलंबित केले. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी ही कारवाई केली. भिडे पुण्याला गेले होते, पण त्यांच्या संरक्षणासाठी असलेले पाच पोलीस गेलेच नाहीत. त्यामुळे त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी भिडे यांना पोलीस संरक्षण दिले होते. पण भिडेंनी हे संरक्षण नाकारले होते. तरीही दोन पोलीस भिडे यांच्यापासून काही अंतरावर उभे राहून संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. चार महिन्यापूर्वी कोरेगाव-भीमा दंगलीचे प्रकरण घडले. भिडेंविरुद्ध पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झाला. कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ राज्यात बंद पुकारण्यात आला. या बंदला सांगलीत हिंसक वळण लागले. त्यामुळे पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी भिडेंच्या संरक्षणात वाढ केली. एकूण आठ पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी तैनात केले. यामध्ये दिवस आणि रात्र अशा दोन सत्रात पोलीस कर्तव्य पार पाडतात. रात्रपाळीवर पाच पोलीस असतात. सांगली शहर, विश्रामबाग, पोलीस मुख्यालय स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील हे पोलीस आहेत.
भिडे २० एप्रिलरोजी पहाटे साडेपाच वाजता एसटी बसने पुण्याला कामानिमित्त गेले होते. ही बाब रात्रपाळीवर असलेल्या पाच जणांना समजले नाही. त्यांना भिडे खोलीत झोपले असतील, असे वाटले. दिवसा कर्तव्य बजावणारे पोलीस आल्यानंतर रात्रपाळीवरील चौघे निघून गेले. सकाळचे दहा वाजले तरी भिडे अजूनही दिसत नसल्याने दिवसा आलेल्या चौघांनी चौकशी केली. त्यावेळी भिडे पुण्याला गेल्याचे समजले. त्याचदिवशी रात्री भिडे पुण्याहून परतले. परंतु भिडेंसोबत पुण्याला पाच पोलीस गेले नसल्याची माहिती पोलीसप्रमुख शर्मा यांना समजली. त्यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीत हे पाचजण त्यांच्याबरोबर गेले नसल्याचे निष्पन्न झाले. तसा अहवाल शर्मा यांना मिळाला. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पाचही पोलिसांना शर्मा यांनी निलंबित केल्याचा आदेश जारी केला. तसेच त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही दिले आहेत.
डोळा लागला अन् निलंबित झाले !
कोरेगाव-भीमा प्रकरणात भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. भिडे सायकलवरून एकटेच प्रवास करतात. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची सुरक्षा वाढविण्यात आली होती. संरक्षणासाठी नियुक्ती केलेल्या पोलिसांनाही डोळ्यात तेल घालून कर्तव्य निभावण्याचे आदेश दिले होते. पण २० एप्रिलला पहाटेच्यावेळी या पाच पोलिसांना डोळा लागला. भिडे कधी पुण्याला गेले, हे त्यांना समजले नाही. अगदी सकाळीही पाचजणांनी चौकशी केली नाही. या सर्व बाबींचा विचार करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.
निलंबित पोलीस असे
ए. के. कोळेकर (सांगली),
टी. बी. कुंभार (विश्रामबाग),
एस. ए. पाटील (एलसीबी),
व्ही. एस. पाटणकर, ए. एस. शेटे (मुख्यालय)