दरोडाप्रकरणी पाचजणांना सात वर्षांची सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:28 AM2021-03-23T04:28:25+5:302021-03-23T04:28:25+5:30
सांगली : खरसुंडी (ता. आटपाडी) येथे चाकूच्या धाकाने दरोडा टाकून सोने, चांदीसह रोख दोन लाखांचा ऐवज चोरणाऱ्या सातारा जिल्ह्यातील ...
सांगली : खरसुंडी (ता. आटपाडी) येथे चाकूच्या धाकाने दरोडा टाकून सोने, चांदीसह रोख दोन लाखांचा ऐवज चोरणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पाचजणांच्या टोळीला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.जी. भोसले यांनी हा निकाल दिला.
विनायक काकड्या काळे (वय ३७), काकड्या कृष्णा काळे (३७, दोघेही रा. तडवळे, ता. खटाव), धनाजी जाकिऱ्या पवार (३७, रा. बोंबाळे, ता. खटाव), रिवाल काकड्या काळे (४०, रा. हिंगणे, ता. खटाव) या चार जणांना सात वर्षे सक्तमजुरीची, तर सयाजी शिवाजी काळे (रा. हिंगणे) यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
खटल्याची माहिती अशी की, खरसुंडी येथे ४ ऑक्टोबर २०१३ रोजी ही घटना घडली होती. फिर्यादी जुगदर यांचे कुटुंबीय झोपले असताना रात्री सव्वादोनच्या सुमारास दोन आरोपी हातात चाकू, काठी घेऊन घरात घुसले, तर इतर आरोपी घराबाहेर नजर ठेवून थांबले होते.
यावेळी रंजना जुगदर, राजाराम जुगदर व मयुरी भोसले यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, दोन मोबाइल व दोन लाख रूपये चोरून नेले होते. दरोड्याची घटना घडल्यानंतर आटपाडी पोलिसात याची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक केली होती व त्याचा तपास करून आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. व साक्षीपुराव्याच्या आधारे शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख व अतिरिक्त सरकारी वकील आरती देशपांडे (साटविलकर) यांनी काम पाहिले. सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद राडे, गणेश वाघ, वंदना पवार, रमा डांगे यांनी मदत केली.