कोंत्यावबोबलादच्या सरपंचासह पाचजण तडीपार ; एलसीबीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 08:26 PM2019-08-22T20:26:03+5:302019-08-22T20:28:36+5:30
या टोळीतील नंदकुमार करे हा सरपंच असल्याने राजकीय क्षेत्रातही त्याचा पुढाकार असतो. टोळीतील सर्व सदस्य हे एक मेकांचे चुलत भाऊ व नातलग आहेत.
सांगली : खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीसह उमदी परिसरात दहशत माजविणाऱ्या कोंत्यावबोबलाद (ता. जत)चा सरपंच नंदकुमार करे व त्याच्या चार साथीदारांना तीन जिल्'ातून तडीपार करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.
शिवाजी भिवा करे (वय ३०), नंदकुमार भिवा करे (२९), आप्पासाहेब ऊर्फ आप्पा लिंबाजी लोखंडे (४४), गोरख लिंबाजी लोखंडे (३९), बबन रामा करे (३९, सर्व रा. कोंत्यावबोबलाद, ता. जत) यांना सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्'ातून तडीपार करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नंदकुमार करे हा कोंत्यावबोबलादचा सरपंच असून त्याच्या नेतृत्वाखालीच त्याचा भाऊ शिवाजी करे हा टोळी चालवितो. दोघांनी मिळून एक टोळी निर्माण केली असून खून करणे, खुनाचा प्रयत्न, सशस्त्र दरोडा, जबरी चोरी, मारामारी करणे यासह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत.
न्यायालयातून जामिनावर सुटल्यानंतर ते पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करत आहेत. यामुळे उमदी परिसरातील नागरिकांना त्रास होत होता. या टोळीतील नंदकुमार करे हा सरपंच असल्याने राजकीय क्षेत्रातही त्याचा पुढाकार असतो. टोळीतील सर्व सदस्य हे एक मेकांचे चुलत भाऊ व नातलग आहेत.
या टोळीविरोधात कारवाईचा प्रस्ताव उमदी पोलीस ठाण्याने सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी हद्दपारीच्या प्रस्तावास मंजुरी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सिध्दाप्पा रूपनर, विशाल भिसे, दीपक गट्टे आदींनी केली.